मी आणि अनिल विचारात पडलो. पुढे अनिलचेही तसेच मत पडले.
मी घरी आलो. शशीशी बोललो. ती म्हणाली, पैसे त्याच कामासाठी वापरायचे. मी खूप पैसे पाहिले आहेत. मला त्याचा मोह नाही. आपण काम करूया.
चव्हाणसाहेबांना फार आनंद झाला. शहांचा सल्ला मानलात. छान ! आता व्यवस्थित प्लॅन करा. माझी लागेल ती मदत आहेच. तुमची भ्रमंती तर सुरू आहेच. आता तिला आर्थिक पाठबळही मिळाले. आता मागे फिरायचे नाही. पूर्णवेळ काम आहेच फक्त ते आता तुमच्या आवडीच्या कामाचे आहे.
शशी आतल्या खोलीत ताटे वाढत होती. एक खुर्ची लाकडी, दोन खर्ुच्या पत्र्याच्या. मध्ये टेबल ठेवले. आम्ही छान गप्पा मारत जेवलो. साहेबांना खूप आवडले. राजाराम कॉलेजात असतानाचे दिवस आठवले. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, सुके मटण ही खास कोल्हापुरी खासियत. ते सांगत होते, म्हणाले, या तांबड्या रस्स्यासाठी त्यावेळी आम्ही अनेक मित्र एकत्र भवानी मंडपाजवळच्या एका खानावळीत जात असू. मला वाटते ती चोरग्यांची खानावळ असावी. लोक रांगा लावून जेवत. आम्ही कधीतरी त्याचा आस्वाद घ्यायला जात असायचो.
टोपी नसलेले, अवघडून खुर्चीत बसलेले यशवंतराव आजही नजरेपुढून हलत नाहीत. दीड-दोन तास गप्पा मारीत बसले. त्यांना वेळेचा तसा आता फारसा प्रश्न नव्हता. अठरा अठरा तास काम करणारा हा माणूस अचानक रिकामा झाला होता.
साहेब म्हणाले, लक्ष्मण, एक बरे झाले मला घर समजले. फारशी शोधाशोध न करता घर सापडू शकेल. शशीचा त्यांनी निरोप घेतला. तिने पायाला स्पर्श करून नमस्कार केला. मला वाटते ते पुन्हा येईन म्हणाले, पण पुन्हा तसा योग आला नाही. ते पुन्हा जेवायला आले नाहीत. घरीही आले नाहीत. कुठे माहीत होते की ही त्यांची शेवटचीच भेट होती. काळाच्या उदरात काय दडले असेल, सांगता येत नाही. मी शशीला सांगितले नि त्यांच्याबरोबर बाहेर पडलो. वाटेत थोडावेळ त्यांचे मित्र बन्याबापू गोडबोले यांच्याकडे थांबलो. त्यांचा चहा आणि गप्पा गोष्टी झाल्या. आम्ही निघालो कराडकडे. मी म्हटले, बोगद्याकडून जाऊया. रस्ता थोडा कच्चा आहे. गाडी पुन्हा बोगद्याकडे वळली. बोगदा पार करून आम्ही खिंडीतल्या गणपतीजवळ आलो.
साहेब म्हणाले, लक्ष्मण, या खिंडीतल्या गणपतीला नारळ वाढवल्याशिवाय मी लोकसभेचा फॉम भरत नाही. त्याने लोकांना बरे वाटते. आणि खरे तर संघाचीही मते आपोआपच आपल्या पारड्यात पडतात. दुसरे, मी फॉम भरण्यापूर्वी राजमातांना अदालतवाड्यात जाऊन नमस्कार करतो. मग गणपती, मग फॉर्म. तुम्ही नास्तिक आहात. तुम्हाला हे चालणार नाही. पण लोकांच्या श्रद्धा जिथे असतात तिथे जावे लागते. याचा अर्थ मी देवभोळेपणाला थारा देतो असे नाही. उलट, ते काही लोकांच्या रोजगारहमीचे काम आहे असेच मला वाटते. तुम्ही जसे स्पष्ट बोलू शकता तसे मी बोलत नाही. काही पथ्ये पाळावीच लागतात. मी दर्ग्यातही जातो. तेथेही चादर चढवतो. आता तुम्ही एक काम सुरू करताय. काय स्वरूप असेल त्याचे ?
साहेब, माझी पण गोचीच आहे. मी शिक्षणाच्या निमित्ताने भटक्याविमुक्तांना सोडून पंधरा-सोळा वर्षे झालीत. आधी सेवादलात नि तेथून समाजवादी परिवारात गेलो. डोक्यातली जात जाणीवपूर्वक काढली. आता परत जातींच्याच दलदलीत जातो आहे. सगळी स्थिती तीच. तीच हागणदारी, ओसाड उघडे माळ, ओढ्यांचा किंवा नदीकाठावर बिर्हाडे मांडलेली. बिर्हाडे दिसली की एस.टी.तून खाली उतरतो. त्यांच्याबरोबर चालू लागतो. माणसे हळूहळू बोलू लागतात. आधी खात्री करून घेतात, माणूस आपलाच आहे का, पोलिसवाला तर नाही किंवा त्यांचा खबर्या तर नाही ? खात्री झाली तर बोलू लागतात. काही जमाती फारच चाणाक्ष, हुशार. मी आणि आमच्या समाजातले एक जाणकार कार्यकर्ते औरंगाबादच्या कैकाडी समाजातले. मी आणि ते, पारध्यांच्या एका वस्तीवर जाण्याचे ठरवले. सातारा तांडा नावाचा लमाणतांडा आहे औरंगाबाद शहराजवळ. मी गेलो होतो व्याख्यानासाठी. आसारामगुरुजींना म्हणालो, जाऊन येऊ पारध्यांकडे. आम्ही चालत चालत बरेच गेलो शेताच्या बांधाबांधाने. मध्ये ओढा आला. ओढा म्हणजे मोठी वघळ होती. ओढ्याच्या पलिकडे माळावर लहानमोठे दगड विखरून पडले होते. त्या दगडांच्यामध्ये पाचपन्नास माणसांची बिर्हाडे एका भल्यामोठ्या लिंबाच्या झाडाखाली राहिली होती. आम्ही ओढ्याच्या अलिकडच्या काठावर उभे होतो. पलिकडे माणसे दिसत होती. आम्ही वघळ ओलांडून पलिकडल्या काठावर चढलो. आता किती वेळ लागला असेल ? अक्षरशः दोन मिनिटेसुद्धा नाही. पलिकडच्या काठावर गेलो तर एकही माणूस नाही. पळायला कुठे जागा नाही. लपायलाही जागा नाही. भुताटकी झाल्यासारखी झाली.