साहेब हुंकारत होते.
आम्ही तसेच पुढे गेलो तर लिंबाखालच्या झोपडीत एक बाळंतीण बाई. अंगावरले रक्त तसेच ! सारे उघड्यावर. आम्हीच शरमेने मान खाली घातली. एक म्हातारी दारात. गुरुजींनी पारधी भाषेतून म्हातारीशी बोलायला सुरुवात केली. त्यांना सारे ओळखत होते. म्हातारीने खात्री करून घेतली. उभी राहिली काठीसारखी. लांबच्या लांब काड्यावर बुजगावणे दिसते ना तशी. तिने मोठ्याने '- हा तुम्हा म्हणू' अशी साद घालीत पारधी भाषेतून हाका मारल्या आन् काय आक्रित ! माणसं भराभरा जमू लागली. सारी उघडी, लंगोट्यावर, बायाही लुगडी नेसलेल्या कंबरेपुरत्या. हातापायाचे मुटकुळे करून, दगडासारखे, पाय पोटाशी घेऊन गपचीप पडलेले. माळावरल्या दगडासारखीच ह्यांनी मुटकुळी बांधलेली. पोलिसांचा बाप आला तरी ओळखता येत नाही. पोरंलेकरं बायांच्या पोटाशी. बघता बघता पाचपन्नास बाया, पोरे, बापे जमले. मी, आसारामगुरुजी बैठकीला बसलो. एकाने बोलावे बाकीच्यांनी ऐकावे असा रिवाजच नाही. कोण काय बोलतोय समजत नाही. नुसता कालवा. पोरांच्या अंगावर कळा नसते. एका एका माणसाला डझनात पोरे बोलता बोलता म्हातारीने सांगितले, 'ह्या माझा चौथा नवरा. मागच्याच साली केला.' आता मात्र साहेबही उडाले. पुढे आणखी आक्रित आहे. तिला मी म्हणालो, मुले किती ? ती म्ळणाली इस आन् दोन. नवरे चार, सात लॅक. बाकी समद्या लेकी. समद्यांची लग्नं झाली.
साहेब, या समाजात मुलगी म्हणजे संपत्ती समजतात. मुली विकता येतात. भाड्याने देता येतात. गहान ठेवता येतात.
आता मात्र साहेब खरोखरीच अचंबित झाले होते. लक्ष्मणराव, काय सांगता काय, अशी स्थिती आहे ?
होय साहेब, विकतात याचा अर्थ दुसर्या जातीत नव्हे. सारे व्यवहार जातीतच होतात.
पण असे का ?
साहेब, विकण्यासारखे एवढे एकच तर साधन आहे. पोलिस, वकील, कोर्ट, गावचे गुंडलोक यांना पैसा द्यावा लागतो तर काय विकणार ? या म्हातारीला न्हाणे आले तेव्हापासून मूले झाली. प्रत्येक नवर्याने मुली काढून घेतल्या. मुले बाईसोबत राहिली. बापांनी मुली विकल्या. जोवर मुले होत होती तोपर्यंत मुलं झाली. पुरुष या समाजात फार जगत नाहीत. पोलिस मारतात. तुरुंगात किंवा बाहेर. शिकार करावी तसे गावचे लोक यांची शिकार करून मारतात. बहुसंख्य पुरुष तुरुंगात खितपत पडतात. तेथेच मरतात. किंवा सुटून आल्यावर हे त्याला मारुन टाकतात.
का बरे ?
तो म्हातारा यांच्या सोबत पळू शकत नाही. अडचण होते. मग सोडून देतात. खबर्या झाला तर मारून टाकतात.
लक्ष्मण, हे सारे कादंबरी, कथा, चित्रपट, नाटक यापेक्षा कल्पनातीत आहे. हे सारे खरे असेल तर आपण कोणत्या शतकात आहोत ?
इसवी सनाच्या पूर्वीच्या विसाव्या शतकात !
इतक्या मोकळेपणाने स्त्रीपुरुष संबंध उघड्यावर चालतात की ते बघूच शकत नाही आपण. म्हटले तर साहेब, ही माणसे मानवी वंशात जन्माला आली म्हणून ही माणसे, एरवी जनावरांच्यात यांच्यात कोणता फरक आहे. या देशाने आम्हाला माणूसच मानलेले नाही. आमची बेरीज-वजाबाकी माणसात नाही.
लक्ष्मण, 'उपरा'त एके ठिकाणी तुम्ही पार्लमेंटवर बॉम्ब टाकण्याचा उल्लेख केलाय. तो वाचून मला फार धक्का बसला होता. माझ्या गावात माझ्या मतदारसंघात राहणारा एक तरुण पोरगा पार्लमेंटवर बॉम्ब टाकावा असे म्हणतो याचे मला फार वाईट वाटले होते. आश्चर्य वाटले होते आणि थोडा रागही आला होता. पार्लमेंट ही फार पवित्र गोष्ट आहे असे मनापासून मी मानतो. पण तुमचे हे सारे अनुभव ऐकले की मन कसे सैरभैर होते. तुमच्या जागी मी असतो ना तर मीही पार्लमेंटवर बॉम्बच टाकावा असे म्हटले असते. खरोखर मुळातून हादरवून टाकणारे, सुन्न करणारे आहे हे सारे. आपण सत्य ऐकतोय की कथा, चिमटा काढून पाहिले पाहिजे. काय माणसांची स्थिती आहे. लक्ष्मण, हे सारे आले पाहिजे. लोकांना समजले पाहिजे. लोकांचे प्रबोधन झाले पाहिजे. अहो, यातले काहीही माहीत नाही आम्हा लोकांना ! कसले राज्यकर्ते आम्ही. फार गिल्टी वाटते. कुठे दैनिकात का लिहीत नाही सारे हे अनुभव. डोळे उघडतील लोकांचे. खरेच, मला जसे सांगितलेत तसेच लिहा. फार गरज आहे याची.