यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २५-२१०९२०१२-३

काय ?  सारे काही सांगता येत नाही.

मी पुन्हा साहेबांना सांगू लागलो.  त्याचे काय आहे साहेब, दुपारच्या वेळेला स्त्रियाच घरात असतात.  ही वेळ बरोबर हेरून ते गिर्‍हाईक शोधत असतात.  तरुण बाई आहे, मूलबाळ नाही, ती घरात कुणी नाही असे पाहून याला बोलावते.  आपल्याला मूलबाळ नाही असे सांगते.  की हा एकदम गंभीर होतो.  आभाळाकडे पाहतो.  तिच्या हातावरल्या रेषा पाहतो.  डोळे मिटायला सांगतो.  स्वतः डोळे मिटतो.  तिला डोळे उघडायला सांगतो.  याच्या हातातल्या लिंबाच्या फोडीतून रक्त येऊ लागते.  बाई घाबरते.  तो म्हणतो करणी, करणी केलीय जावू बाईने.  आणि एकदा ही मात्रा चालू झाली की बास.  वर्ष-दोन वर्षे हा या बाईला लुबाडू लागतो.  अंगार्‍याच्या पुड्या देतो.  खूप खट्याळ आहे, भूत काढावे लागेल.  एवढा एवढा पैसा लागेल.  तिच्याकडून सारा वृत्तांत, सासुरवास, सारे ऐकून घेतो.  आडाखे बांधतो.  अंगारा, धुपारा, उपवास, नवस अशी नादाला लावतो.  ती बिचारी पोरासाठी सारे करते.  जोशी पोराला जन्मालाही घालतो.  पण गिर्‍हाईक बघून.  अत्यंत सावध आणि चाणाक्ष.  दुपारी बायकोकडून ऐकल्यावर नवर्‍याबद्दल सारे जाणून घेतो.  नवर्‍याला शोधून काढतो.  त्याला तंतोतंत पटणारी माहिती सांगतो.  करणी केल्याचे सांगतो.  नवराबायको दोघांनाही नादाला लावतो.  शे-पाचशे काढतो नि पसार होतो.  हे सारे गिर्‍हाईकावर अवलंबून.  तत्काळ विसरून जाण्याचा माणसाचा गुण असतो.  अंगठा छाप असलेली ही माणसे असे पोटासाठी खोटेनाटे करून, लबाड्या करून दोन वेळचे अन्न मिळवीत असतात.  भिक मागणे, पोटासाठी लाचारीने, कधी हुशारीने गावे बदलीत ही माणसे पिढ्यान पिढ्या जगत असतात.

सातार्‍यात साहेब मला गाडीतून स्टँडवर सोडतात.  रसिकभाई नि साहेब पुढे कराडला जातात.  मला हत्यारीचे भांडण निस्तरायचे असते.

गाडी निघून जाते.  मी माझ्याच नादात घरी पोहचतो.

ती. सौ. वहिनींना, बाबांना सप्रेम जयभीम.

तुझा,
लक्ष्मणकाका