साहेब, ही माणसे निव्वळ अडाणी. पण सुताला धरून स्वर्गाला जातात. माणसाचा चेहरा बघून ते चेहरा वाचतात. हातावरल्या रेषा पाहण्यात वेळ काढतात. तेवढ्यात घर बघतात. घरातल्या चपला सांगतात, माणसे किती, स्त्रिया किती. लहान मुले किती. मुली किती. घरात मुले असतील तर कोपर्यात बॅटबॉल असतो. वलणीवर बाळायला घातलेली धोतरे, साड्या, धुतलेले कपडे, घराचा साईज, घराची कळा, अंगण सांगते. निरीक्षणशक्ती मोठी असते. अत्यंत बोलके असतात. विचारच करू देत नाहीत. प्रत्येकाच्या आयुष्यात दुःख असतेच. आजार असतो, म्हातारे आईवडील असतात, अपघात असतो, भाऊबंदकी असते. बास ! या भांडवलावर पुढचा प्रवास सुरू होतो. तो सांगू लागतो, मोठ्या अडचणीतनं वाचलास. माणूस मान डोलवायला लागतो. ते पटू लागते. मग जे पटते ते धरून तो बोलू लागतो. मग त्याला जे पटेल ते ते सांगायचे. साहेब, हिप्नोटाईज केल्यासारखे करतात. अंगातला शर्टसुद्धा माणूस काढून देतो. शर्ट घेणार आणि वर म्हणणार, 'तू मला काही दिलं नाही, मी काही घेतलं नाही, तुझं मन बघितलं.' चारपाच किलोमीटर गेल्यावर माणसाला भान येतं. अरे, आपण उघडे आहोत !
लक्ष्मण, या भविष्याचे मोठे आकर्षण खेड्यापाड्यातल्या माणसांना असते. मलाही होते. मीही ऐकत असे. यांचे बोलणेच ऐकत राहावे असे. शिक्षण नाही मग जमते कसे ?
साहेब, भविष्य सांगणार्या जमाती बारागावचे पाणी प्यालेल्या. रोज नवे गाव, नवी माणसे. त्याने माणसांचे मानसशास्त्र पाठच असते. करपल्लवी, नेत्रपल्लवी, हस्तरेषा पाहणारे, पोपटवाले, पहाटे फिरणारे पिंगळे हे सारे जोशी, जोगी. यातले कुडमुडे जोशी, मेडंगी जोशी, जोश्यांच्याच पंचवीस-तीस जाती आहेत.
लक्ष्मण, याचा स्वतंत्र अभ्यास केला पाहिजे, नाही ?
होय साहेब, ही माणसे अडाणी आहेत असे वाटणार नाही. असे बोलण्यातले चातुर्य असते. आता पोपटवाला रस्त्याच्या कडेला बसलेला असतो. पिंजर्यात पोपट असतो. पिंजर्यासमोर कार्डांचा ढीग असतो. रस्त्याच्या कडेला पोते अंथरून त्यावर बसलेला हा जोशी कपाळाला गंध, पांढरीशुभ्र टोपी, धोतर, मलमली पांढरा सदरा, तोंडात पान, कायम रस्त्यावर पिचीपिची थुंकत गिर्हाईकाची वाट बघत असतो. गिर्हाईक आले की हा पोपटाला बोलावतो. पोपट शिकवून ट्रेंड केलेला असतो. तो बाहेर येतो. गिर्हाईक बुड टेकते. काय असेल आपल्या नशिबात हे पाहण्यात गिर्हाईक फार उतावीळ असते. तर याचा पोपट ढिगातले कार्ड काढतो, खाली टाकतो. पुन्हा त्या कार्डाभोवताली नाचतो. पुन्हा कार्ड काढतो. अशी चार-पाच कार्डे खाली टाकतो. आणि गंमत झालेली असते. तो चार-पाच कार्डांतले कार्डे काढतो. या जोश्याला, साहेब, एका अक्षराचा गंध नसतो. मजकूर सारा पाठच असतो. आणि सारा मजकूर सारखाच असतो. कोणतेही कार्ड निघाले तरी मजकूर तोच असतो ! ऐकणारा मान डोलावू लागतो. जोशी त्याचा ताबा घेतो. पक्षी पुन्हा पिंजर्यात बंद असतो. दुपारपर्यंत हा धंरा करायचा नि दुपारी बारा वाजता ओढा गाठायचा. धोतराने धडप्याने मासे धरायचे. खेकडे धरायचे आणि बिर्हाडावर आणून आस्तुरीला द्यायचे. चार पैसे बरे मिळाले की एखादा कप देशी टाकायची.
पण लक्ष्मण, त्यांचे शिक्षण झाले नाही, मग हे कसे ?
साहेब, हे आमच्या धंद्यातले सिक्रेट आहे. कुणाला सांगू नका.
साहेब हसू लागले.
सुप्रिया, या माणसाला जो सेन्स होता तो क्वचितही इतरांकडे दिसणार नाही. ते मला विचारू लागले मग हे लोक करणी कशी करतात.
नको साहेब, हे फारच सिक्रेट आहे. ते सांगितले तर त्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न निर्माण होतील. शिवाय मारही खावा लागेल.
पण मी नाही ना कुठे बोलत. आपल्या दोघांपर्यंत सिक्रेट. रसिकभाईंना कशाला कोण विचारणार ?
मग मी त्यांना सांगू लागलो. आता तूही कुणाला सांगू नको.