यशवंतराव चव्हाण आठवण आणि आख्यायिका-पत्र २५-२१०९२०१२-१

रसिकभाई तर पार उडूनच गेलेले.

लक्ष्मणराव, कसे काम करता या लोकांत ?

साहेब म्हणाले, पण ती पोलिसांकडे का जात नाही म्हणत होती ?

त्याची मोठी कहाणी आहे साहेब.  फलटणच्या माकडमाळावर फलटण बारामती रस्त्याला लागून माकडवाला माळ आहे ना तिथे झबझब्या हत्यारी हे दांपत्य राहते.  दहाबारा मुले असतील.  त्यातली दोन मुले सस्तेवाडीला राहत होती.  सस्तेवाडीला झबझब्या हत्यारी राहत असताना कुठेतरी चोरी झाली.  कुठेही चोरी झाली तरी पोलिस गुन्हेगार समाजाची पाले कुठे उतरली ते पाहतात.  सस्त्याच्या वाडीत गिरणीत ठेवलेले पीठ चोरीला गेले होते.  पोलिसांत खबर गेली.  आणि पोलिसांनी माग नेला तो या पारधी कुटुंबाकडे.  घरात पुरुष कुणीच नव्हते.  हत्यारी दारात बसली होती.  पोलिस इन्स्पेक्टरने त्यांच्या पद्धतीने चौकशी सुरू केली.  तिला पिंजर्‍यात बसवू लागली.  हिने मोठा विरोध केला.  मी काही केले नाही म्हणून विनवीत होती.  पण पोलिसांनी तिला गाडीत घातले नि लॉकअपमध्ये बंद केले.  आत गेल्यावर इतके अत्याचार केले की मला सुद्धा लाज वाटते.  पोलिस किती अमानुष वागवतात ते न सांगितलेलेच बरे.  तिला नग्न करून तळपायांना ठोकले.  ती कबूल होत नाही म्हटल्यावर तिच्या मागच्या अंगात हातातली काठी घातली.  रक्ताची धार लागली.  ती काही थांबेना, मग पोलिस घाबरले त्यांनी तिला दवाखान्यात नेहले.  वर्तमानपत्रांच्या प्रतिनिधींपर्यंत बातमी गेली.  पोलिसी अत्याचार जनतेसमोर आले.  फलटणचे ऍड. जी. बी. माने साहेबांनी या प्रकरणात मोठे काम केले.  प्रचंड मोर्चे काढले.  संबंधित पोलिसाला निलंबित करावे लागले.  फलटणच्या कोर्टात खटला खूप गाजला.  माने वकीलांनी सर्व बुद्धीपणाला लावून केस लढवली.  पोलिस इन्स्पेक्टरला नोकरी तर गमवावी लागलीच पण सक्तमजुरीची शिक्षा झाली.  पोलिस अत्यंत क्रूरपणे पारधी स्त्रियांशी वागतात.  म्हणून हत्यारी पोलिसांना घाबरते.

चव्हाणसाहेब अत्यंत अस्वस्थ झाले.

लक्ष्मण, काय म्हणाव हेच समजत नाही.  शासनात असताना शासनाची एकच बाजू समोर असते.  सत्तेत असणार्‍यांनी फार काळजीने या प्रश्नांकडे पाहिले पाहिजे.  पण कसे होणार लक्ष्मण ?  ही एका बाजूला जंगली, तुफानी माणसं.  त्यांचे आभार फाटलेले.  कसे होणार संघटन ?  वार्‍यावरली वरात.  यांची मोट बांधायची कशी ?  फार अवघड आहे.  स्वातंत्र्याची चळवळ सोपी वाटू लागते.  शत्रू परका होता.  सारा देश त्याच्या विरोधी उभा होता.  आम्हा लोकांना मोठी मदत होती जनतेची.  जनतेची मोठी संरक्षणाची फळी होती.  या कामात लक्ष्मण, तुम्हाला कोण मदत करणार ?  सुन्न व्हायला होते.  जनतेने ज्यांना स्वीकारलेले नाही, शत्रू मानले आहे.  त्यांच्या पाठीशी कोण उभे राहील ?

गाडीतली चर्चा फारच उदासवाणी झाली.  मी हळूच साहेबांना त्याच्यातून बाहेर काढले.  

साहेब, देगा उसका भला, न देगा उसका भला.  एका गावातला पाटील वाईट असला म्हणजे सारे पाटील वाईट नसतात.  ते गाव तिसर्‍या दिवशी आम्ही सोडून दुसरीकडे जातो.  फारच वाईट अनुभव असेल ना तर त्या गावातला मुक्काम लगेच हलतो.  साहेब, फलटणमधले आपले पत्रकार रवींद्र बेडकिहाळ आहेत ना ?  ते आणि मी या झबझब्या हत्यारी यांच्या घरी गेलो होतो.  मी कसे काम करतो, या जंगली लोकांशी कसे बोलतो, हे पाहायला नि त्यांना मदत करायला आले होते.  उघड्यावरचा प्रपंच.  हत्यारीने चुलीवर कसलीतरी भाजी टाकली होती.  तव्यावरली भाजी ती हलवीत होती.  रवींद्रने ते सारे पाहिले.  पाहता पाहता त्याला वाटले, काय भाजी आहे ?  तसे त्यांनी विचारले.

हत्यारी म्हणाली, काय की.

रवींद्रने त्यातली भाजी उचलली आणि तोंडात घातली.  ती इतकी कडू होती की रवींद्रना जन्माची आठवण राहिली.  दिवसभर ते थुंकत होते.  तरी तोंडाची कडू चव जात नव्हती.  ते मला एवढेच म्हणत होते, आपण कोणत्या देशात राहतो.  भातावरले तूप नसले तर आम्हांला चालत नाही.  गरम वाफाळलेला भात नसला तर चालत नाही.  काय हे जग आहे ?  थोड्यावेळाने आम्ही फलटणमधल्या गोसावी वस्तीत गेलो.  रवींद्र बरोबर होते.  यातले जोशी समाजातले लोक होते.  त्यात शंकर चव्हाण नावाचा एक आमचा कार्यकर्ता होता.  हे सारे भविष्य सांगणारे लोक.

इतक्या अडाणी लोकांना.  कसे जमते, लक्ष्मण ?  साहेब म्हणाले.