१९५२ च्या निवडणुकीत केवळ यशवंतरावांचे शब्दाखातर मी बाळासाहेब देसाई यांच्या निवडणूक प्रचारासाठी भागात गेलो. त्या इंग्रजी रावसाहेबांनी पाटण तालुक्यातील अनेक स्वातंत्र्य सैनिकांचा छळ केला होता म्हणून माझा त्यांचेवर राग होता. काँग्रेसचे काम पाटणमध्ये करण्याऐवजी कराडमध्ये केलेले काय वाईट अशी माझी भूमिका होती. त्यामुळे पाटणला गेलो नव्हतो. बाळासाहेब देसाई अवघ्या ९१ मतांनी निवडून आले. मी गेलो नसतो तर काही हजारांनी त्यांचा पराभव झाला असता. प्रथमत: त्यांनी कृतज्ञता दाखविली पण यशवंतरावांचा जावई म्हणून पुन्हा त्यांचा मत्सर पेटला. त्यामुळे माझे राजकीय भवितव्य सीमित झाले होते. त्यातच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, सर्वच संकटात. त्या वेळी कराडला ‘‘विचार’’ नावाचे साप्ताहिक सुरू केले. १९५७च्या निवडणुकीत सर्व वेळ दिला. परंतु वकिली आणि संसार बसला.
मी काही दिवस मुंबईला गेलो, यशवंतराव त्यांना एखादी गोष्ट पसंत नसेल तर ती करू नको असे सांगत, परंतु काय करावे हे कधी सांगत नसत. एका दृष्टीने त्यांचे बरोबर होते, ज्याचा त्यानी निर्णय घेऊन वागणे हेच खरे ! एकेकाळी नोकरी करावयाची नाही हे ठाम निर्धाराने सांगणारा मी संसाराचे जू मानेवर बसल्यावर वेळेला नोकरी करण्याचा निर्णय घेतला. मनपसंत नोकरी मिळवणेत दोन वर्षे गेली. १९५९ साली रतुभाई आदानी स्थानिक स्वराज्य मंत्री असताना जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी सार्वजनिक कार्यकर्तामधून घ्यायचे ठरले. मी प्रयत्न केला, मला इंटरव्ह्यूला बोलावले, यशवंतरावांना हे समजले, ते अस्वस्थ झाले. मी इंटरव्ह्यूला मुंबईला गेलो, त्या वेळी त्यांचे बंगल्यावर न उतरता गिरगाव लॉजमध्ये उतरलो. तिथे मला मामासाहेबांचा निरोप आला की, मी मुलाखतीस जाऊ नये आणि ही नोकरी स्वीकारू नये. त्या वेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे वातावरण तप्त होते. अशा वेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या जावयास डेप्युटी कलेक्टरची नोकरी वशिल्याने दिली म्हणून त्यांचेवर तुफान टीका झाली असती, असे त्यांना वाटले, त्यामुळे त्यांचा मला विरोध होता. शिवाय मी नुकतेच यशवंतरावांचे पहिले चरित्र प्रसिद्ध केले होते. त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीवर टीका होती त्यामुळे विरोधकांना यशवंतरावांचेवर राग काढायला ही संधी चालून आली होती.
मी निर्णय घेतला, मामासाहेबांचे ऐकायचे नाही. त्यांना भेटायचे देखील नाही. मी जर माझ्या पात्रतेने एखाद्या पदाला योग्य असेन तर नातेवाईक म्हणून यांचा विरोध का असावा? आणि खरोखरीच द्विभाषिक मुंबई राज्यात त्या वेळी जे १५ पंचायत ऑफिसर डेप्युटी कलेक्टरचे ग्रेडवर घेतले त्यात माझ्यासह ३-४ च खरे सार्वजनिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक होते. वयाची आणि पदवीची अट होतीच. बाकीचे निवडलेले, कुणाचा बाप पुढारी, तर कुणाचा भाऊ पुढारी म्हणून, त्यांचा सार्वजनिक कार्याशी काही संबंध नसता ते निवडले होते. मी ताबडतोब सांगलीला हजर झालो तर समितीचे आमदार नागनाथ नायकवाडी, जी. डी. लाड, वाय. सी. पाटील यांनी तर माझे अभिनंदन केले. दत्ता देशमुख भेटले असता ठीक झाले असे म्हणाले. एस. एम. जोशी आणि मी येरवड्यात एकत्र होतो, त्यामुळे मला कुणाची भीती वाटत नव्हती. प्रथम काही दिवस यशवंतरावांची मात्र झोप उडाली होती. पुढे माझे संदर्भात यशवंतरावांचेवर कसलीही टीका झाली नाही त्यामुळे ते निर्धास्त झाले. टीका झाली असती तर नोकरी कस्पटासमान समजून मी नोकरीचा राजीनामा दिला असता. आता संसार सुरळीत चालू होता.
जिल्हा ग्रामपंचायत अधिकारी म्हणून काम करताना समाधान होते तरी मामासाहेबांच्या इच्छेविरुद्ध आपण वागलो याची खंत होती. तेव्हा ज्या वेळी आपण अडचणीतून बाहेर आलो असे वाटेल त्या वेळी नोकरीचा राजीनामा द्यावयाचा असे मी ठरवले होते. त्याप्रमाणे १९६७ साली मी राजीनामा देणार असे मामासाहेबांना सांगितले त्या वेळी राजीनामा देऊ नये असा त्यांनी सल्ला दिला. परंतु माझा निर्णय कायम असल्याने मी राजीनामा दिला. मी जिल्ह्यात परत आल्यावर माझे संदर्भात यशवंतरावांचेवर टीका सुरू झाली. यशवंतरावांना पाहुण्यारावळ्यांचे राजकारण करावयाचे आहे. वास्तविक तसे काहीच नव्हते, आणि यशवंतरावांना पाहुण्यांचे मदतीने राजकारण करण्याइतके ते कमकुवतही नव्हते. परंतु काँग्रेसवालेच त्यांच्यावर ही टीका करू लागले. संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेत्यांनी मनाचा जो दिलदारपणा दाखवला तो सत्तेच्या राजकारणापायी स्वकीयांनी, आपल्याच पक्षबांधवांनी दाखवला नाही याची मला आणि मामासाहेबांनाही खंत वाटत होती. मामासाहेब मात्र आपल्या स्वकीय टीकाकारांचे अपराध उदारपणे पोटात घालत असत, त्यांना मदत करीत असत.
संयुक्त महाराष्ट्राचे चवळवळीनंतर दहा वर्षांनी देशाचे राजकारणांतदेखील निर्नायकी परिस्थिती आली. बेंगलोर अधिवेशनानंतर राष्ट्रपती निवडणुकीत पक्षात मोठी पूâट पडली, एक पक्षाचे दोन पक्ष झाले. यशवंतरावांनी राजकीय धोरणानुसार आपली भूमिका घेऊन थोडे जुळतेमिळते घेतले. तरी अंतस्थ वाद चालूच होता. देशात यशवंतरावांचेवर टीका होत होती. यशवंतरावांचे चरित्र मी मराठीत लिहिले होते, परंतु त्याचा प्रसार नागपूर, कोल्हापूर पलीकडे नव्हता. यशवंतरावांचे चरित्र महाराष्ट्राबाहेर इतरांच्या वाचनात आले तर काही प्रमाणात यशवंतरावांचा अकारण होणारा द्वेष, विरोध कमी होईल असे वाटले म्हणून मी यशवंतरावांचे इंग्रजी चरित्र लिहिले. माझ्या एका स्नेह्याची मला खूप मदत झाली. त्या पुस्तकात यशवंतरावांची एक मुलाखत घेण्यासाठी मी मित्रांसमवेत आठ दिवस दिल्लीत राहिलो आणि यशवंतरावांना वेळ मिळेल त्याप्रमाणे त्यांचेशी गप्पागोष्टी केल्या.