१९४६ ते ६० यशवंतराव अव्याहत सत्तेवर होते. तरी शुक्रवार पेठेतील छोट्या घरात मार्यदित उत्पन्नात त्यांच्या कुटुंबाचा संसार सुरू होता. बाहेरच्या खोलीत एक मोठी सतरंजी बसायला, पण एकही खुर्ची नव्हती. घरी भेटायला मोठे मोठे लोक येत. सा-यांनाच अवघडल्यासारखे होई. एकदा त्यांचे पुतणे शिवाजी यांना दाखवायला एक मुलगी आली. तेव्हा मात्र घरच्यांनी त्यांना बजावले, ‘‘काय, तुम्ही मंत्री म्हणून लोकांनी इथं मुलगी द्यायची काय? सतत सार्वजनिक कामात मग्न. घरी काही लक्ष देणार की नाही?’’ अर्थात सगळी मुले पुढे मोठी झाली. त्यांची लग्ने झाली. सगळे कुठल्या ना कुठल्या व्यवसायात पडले. परिस्थिती सुधारली. यशवंतरावांनीही शक्य ती मदत केली.
त्यांच्या भगिनी राधा आक्कांची भाऊबीज कधी चुकली नाही. यशवंतराव दिल्लीला होते. तिथून कुणी क-हाडला निघाला तर त्याला विनवून ‘‘एवढं आक्काला पोचवा,’’ असे सांगत. आपल्या कर्तृत्वावर उभा राहिलेल्या या भावावर आक्काचेही खूप प्रेम होते. त्यांच्या निधनाचे वृत्त तिला कळले तेव्हा तिला मूर्च्छाच आली. अश्रूंच्या पुरात तिने आपल्या या भावावरील प्रेमाची बंधने खुली केली.
यशवंतरावांजवळ जातिभेद, धर्मभेद असल्या संकुचित विचारांना थारा नव्हता. उंडाळे येथील एका सभेत ते म्हणाले होते, ‘‘बेचाळीसच्या आंदोलनाची आखणी करण्यासाठी मी या भागातील खेड्यापाड्यातून हिंहडलो आहे. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी एका गावात बैठक सुरू होती. जो तो काही ना काही सूचना करीत होता. लष्करातील एक मागासवर्गीय जवान काही सांगण्यासाठी उठला तेव्हा गावचा पाटील चटकन म्हणाला, ‘‘खाली बैस, तुला काय कळतंय?’’ माझ्या मनात विचार आला, कधी तरी बाजार करायला महायुद्धात चार देश पायाखाली तुडवलेला हा जवान मागासवर्गीय म्हणून अडाणी, असल्या कल्पना आपण बदलणार तरी केव्हा?’’
यशवंतरावांचा विवाह १९४२च्या आंदोलनाच्या धकाधकीतच वेणुतार्इंशी झाला. लग्नानंतर पहिल्याच संक्रांत वाणादिवशी त्यांनाही अटक झाली.
पण नंतरच्या जीवनात या गोष्टींचा त्यांनी कधीही उल्लेख केला नाही. राजकारणापासून अलिप्त राहून त्यांनी आपला प्रपंच शुभंकर केला. वस्तुत: त्यांचे माहेर एक सुखवस्तु घर होते. सासरी सुरुवातीच्या काळात जे तुटपुंजे होते तरीही त्यातच आनंद मानून चेह-यावरचे स्मित हास्य कधी मावळू दिले नाही. यशवंतरावांसारख्या कर्ता पुरुषाची ही धर्मपत्नी. प्रपंचातील कर्तेपणा तिने नीटनेटका सांभाळला. जातिभेद, धर्मभेद यांच्या मर्यादा ओलांडलेले, शाश्वत मानवता धर्मावर आधारित असे हे घर होते. वेणुतार्इंनी पावित्र्य, भक्ती यांचे खोलवर संस्कार करून घराचे सुसंस्कृतपण वाढवले. घराचे देवघर बनवले.
आपल्या या मामा आणि मामींच्या वेगळ्या वैवाहिक जीवनातील आठवणी सांगताना बाबुराव कोतवाल म्हणाले, घरातल्या कुठल्याही घटकात नात्यातल्या फरकानं मामींनी कधी पाहिलं नाही. एखादी उणीव नजरेत आली की, मामी मामांशी चर्चा करे. ती उणीव केव्हाच दूर होई. मामांना मामीशी बोलत बसण्यात वेगळा आनंद वाटे. घरगुती गोष्टीप्रमाणे तास तास राजकारणावरही तिच्याशी ते चर्चा करीत. आम्हाला याचं आश्चर्य वाटे. मामा एवढंच म्हणत, ‘‘तिची राजकीय दृष्टी खूप मोठी आहे.’’
प्रेम, आतिथ्य, धीरोदात्तपणा, मनाची श्रीमंती हा चव्हाण घराण्याचा वारसा वेणूतार्इंनी द्विगुणित केला. पण या घराण्याला हा वारसा लाभला तो यशवंतरावांच्या मातोश्री विठामाता यांच्या पुण्याईने. ‘‘भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, मीपणा विसर आणि तू तुझे कर्तव्य कर,’’ ‘ज्ञानेश्वरी’ चे सार आपल्या मुलाला एका वाक्यात सांगणा-या विठामाता अडाणी होत्या. पण मानवतेच्या एक जिवंत मूर्ती होत्या.
विठामाता या देवराष्ट्राच्या. वयाच्या आठव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. त्यांचे पती, यशवंतरावांचे पिताजी बळवंतराव बेलिफाचे काम करीत. घरी सासरचा राबता मोठा. दोन जावा, सासूबाई, पती, दीर, नणंदेची दोन मुले असा मोठा परिवार होता. थोड्या उत्पन्नात जास्त समाधान मिळवून सुखी होणारे हे कुटुंब होते. विठामाता त्यात सहजतेने सामावून गेल्या. पण विठामातांच्या संसार जीवनात त्यांना दुर्दैव, दु:ख आणि संकटे यांच्याशीच सतत सामना करावा लागला. त्यांना सात अपत्ये झाली. पण ज्ञानोबा, राधाक्का, गणपतराव आणि यशवंतराव ही चार अपत्येच जगली.
त्यात पतिनिधनाचे दु:ख त्यांच्यावर कोसळले. मुले मोठी कारायची होती. दु:ख करीत बसायला त्यांना उसंतच नव्हती. पती वारले तेव्हा सगळ्यात धाकटे यशवंतराव चार वर्षांचे होते. पतिनिधनानंतर मुलांचे संगोपन करताना त्यांनी मुलांना संसारतापाचे चटके कधी बसू दिले नाहीत. तिने शेतात मोलमजुरी केली. पायली पायली ओझी डोक्यावरून देह झिजवून पुन्हा पहाटे उठावे, घरचे दळण जात्यावर स्वत: दळावे, मुलांसाठी कोरड्यास भाकरी करावी आणि स्वत:साठी भाकर घेऊन कामाला जावे हा त्यांचा दिनक्रम दहा-बारा वर्षे सुरू होता.