१३४. मामासाहेब-यशवंतराव – बाबूराव काळे
मी कराडला टिळक हायस्कूलमध्ये शिकत होतो. मराठी शाळेत श्री. कुंभार गुरुजींकडून काँग्रेसचे संस्कार झाले होते. त्यामुळे काँग्रेसचा एक तरुण नेता म्हणून यशवंतरावांचेबद्दल मला कुतूहल आणि प्रेम वाटे. विद्यार्थिदशेत स्वातंर्तासाठी कारावास भोगल्याचा अभिमान वाटे. माझे गावी गांधीजयंतीचे कार्यक्रमासाठी १९४१साली यशवंतरावांना आमंत्रण देणेसाठी सकाळीच मी त्यांचे घरी गेलो, यशवंतराव त्या वेळी नुकतेच एल्.एल्.बी. झाले असतील. वकिली सुरू करण्याच्या बेतात असतील. मारुतीबुवाच्या मठाजवळील दोन खोल्यांत त्यांचे कुटुंब राहात होते. यशवंतरावांना प्रथमपासूनच जागरणे करण्याची सवय होती. त्यामुळे ते उशीरा उठत असत. शेजारच्या खोलीत झोपलेत त्यांना उठवून भेटा असे मला सांगितले. मी दार ढकलून आत गेलो तर यशवंतराव एक गोधडी (वाकळ) पांघरून गाढ झोपल्याचे दिसले. मला प्रथम आश्चर्य वाटले, एक वकील वाकळ पांघरून झोपला आहे? मला त्यांच्याबद्दल अधिक आदर वाटू लागला.
बेचाळीस साली ऑगस्टच्या दुस-या आठवड्यात भूमिगत अवस्थेतील डुबल आळीतील त्यांची भेट तर आम्हा ४०-५० तरुणांना स्फूर्तिदायक होती. ते आम्हा तरुणांचे नेते होते, कराडमध्ये बेचाळीसचे चळवळीत जेवढे विद्यार्थी सामील झाले तेवढे जिल्ह्यात दुस-या कुठल्याही शहरातून झाले नव्हते.
यशवंतराव येरवडा तुरुंगात स्थानबद्ध होते. आम्हाला एका बराकीतच ठेवले होते. यशवंतराव त्या वेळी सिगारेट्स ओढीत असत. एकदोनदा त्यांचे लक्षात आले की, आपले पाकिटातील सिगरेट्स कोणीतरी चोरून ओढीत आहे. एक लहान वयाचा कार्यकर्ता त्यांचे समोर सिगरेट ओढायला लाजत असे; पण तुरुंगात सिगरेट मिळाली की चोरून ओढायची त्याला लहर येत असे. यशवंतरावांनी हे ओळखले आणि त्या कार्यकर्ताला त्यांनी सिगरेट घ्या असे म्हटले. तो कार्यकर्ता इतका शरमला की, पुन्हा त्याने चोरून सिगरेट ओढली नाही.
बेचाळीसचा लढा १९४६ साली संपला. मी तुरुंगातून बाहेर आलो. विशेष म्हणजे तुरूंगातूनच मॅट्रिकची परीक्षा दिली होती. त्यात पासही झालो. यशवंतरावांना भेटलो त्या वेळी त्यांनी सांगितले आता चळवळ बंद. कॉलेजचे शिक्षण पुरे कर.
मी पुण्याला कॉलेजच्या दुस-या वर्षाला असेन, यशवंतराव त्या वेळी पार्लमेंटरी सेक्रेटरी होते. एक दिवस अचानक माझे खोलीवर आले. यशवंतरावही कॉलेजला असताना टिळक रोडवर तिथेच जवळपास राहात होते, त्यामुळे माझे राहणेचे ठिकाण त्यांना लक्षात राहण्यासारखे होते. त्या वेळी त्यांचे थोरले बंधू क्षयाने वारले होते. कुटुंबाचा ते एकमेव आधार होते. त्यामुळे त्यांना घरी मोकळेपणाने रडणेही शक्य नव्हते. बंधूंच्या मृत्यूच्या आठवणीने अक्षरश: अर्धा तास ते अश्रू ढाळीत होते. त्यांना कसे आवरावे याचे मलाही भान राहिले नाही. नंतर आम्ही त्यांचे मित्र दयार्णव कोपर्डेकर यांच्या घरी गेलो.
१९५२च्या अखेरीस मी बार कौन्सिलचे परीक्षेस मुंबईस गेलो त्या वेळी िंवटर रोडचे त्यांचे बंगल्यावरच आठ दिवस थांबलो होतो. येताना तर रात्री बारा एक वाजेपर्यंत आम्ही दोघेच राजकारणाच्या आठवणी आणि इतर गप्पा मारीत बसलो होतो. त्यांचा निरोप घेऊन येताना पुण्यात दोन दिवस थांबलो. तिथे मित्रांचे बरोबर एका सेवानिवृत्त मामलेदाराची मुलगी पाहिली. घरच्या माणसांना दाखविण्यासाठी त्या मुलीचा फोटोही घेऊन आलो होतो. माझे मित्र बाबूराव कोतवाल यांचे घरात त्यांचे आक्कांनी चौकशी केली आणि विचारले, ‘‘आमचे गणपूची मुलगी का बघत नाहीस?’’ मी म्हटले, ‘‘पाहू. अजून कुठे काय ठरले आहे? घरच्यांच्या आग्रहासाठी मुली पाहणेचा कार्यक्रम तर सुरू केला आहे. त्या वेळी रामानंद भारती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते आणि किसन वीर व वसंतदादा पाटील हे सेक्रेटरी होते. त्या सर्वांची इच्छा मी जिल्हा लोकल बोर्डाची चीफ ऑफिसरची नोकरी स्वीकारावी अशी होती. त्या वेळी सातारा लोकल बोर्डाचे चीफ ऑफिसर नुकतेच निवृत्त झाले होते. माझेसाठी पाचसहा महिने ती जागा भरली नव्हती. नोकरी करावयाची नाही हा माझा ठाम निर्णय होता. एक स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ता म्हणून माझेबद्दल सर्वांना प्रेम होते. नात्यातील एक मुलगी पसंत होती; परंतु नाताळात चुलते वारल्याने पसंती कळविता आली नाही. तेवढ्यात यशवंतरावांचा मुंबईहून फोन आला. थोडे प्राथमिक फोनवर बोललो आणि त्यांनी कराडला भेटायला येतो असे सांगितले. माझ्या मनात कल्पनाही नव्हती, आम्ही सातआठ दिवस अनेकदा गप्पा मारीत बसलो होतो. त्यांच्याही मनात हा विषय नव्हता. कराडला आलेवर मला बोलावून घेतले. आम्ही दोघेच होतो. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, ‘‘तू चीफ ऑफिसरची जागा स्वीकारणार आहेस काय?’’ मी स्पष्टपणे सांगितले, ‘‘त्याबाबत मी सर्वांना नकार दिलेला आहे, त्याची चर्चा करू नये असे वाटते.’’ ते म्हणाले, ‘‘ठीक, तू चीफ ऑफिसरची जागा स्वीकारणेचे मान्य केले असतेस तर मी लग्नाचा विषय काढणार नव्हतो. कारण साडू प्रेसिडेंट आहे आणि जावई चीफ ऑफिसर हे मला त्रासाचे झाले असते.’’ नंतर मुलगी केव्हा पाहणार असे विचराले. मी आपले बंगल्यावर आठवडा राहिलो, एकत्र बसलो-उठलो, जेवलो आहे, तेव्हा आता नव्याने पाहून काय पसंत करावयाचे आहे? मी मुलगी पसंत म्हटले आणि दोघांतच माझे लग्न ठरले. २३ एप्रिल १९५३ रोजी मी यशवंतरावांचा जावई झालो.