मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३५-२

या त्यांच्या कष्टांना यशही आले. ज्ञानोबा सातवी पास झाले. नोकरी करू लागले. गणपतराव मॅट्रिक झाले, व्यापार करू लागले. क-हाडचे नगराध्यक्ष झाले. आणि यशवंतराव... विठामातांच्या कष्टाचे चीज झाले.

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू कोयनेला आले होते. त्या वेळी आमचे शुक्रवार पेठेतील घर अगदीच चंद्रमौळी होते. पंडितजींना विठामातांना भेटायचे होते. पण त्यांना घरी नेणे प्रशस्त वाटेना. पंडितजी म्हणजे कोण, पंतप्रधान म्हणजे काय, हे माझ्या आईला सांगण्याचा खूप प्रयत्न केला व अखेर ‘‘बाबाचा (यशवंतराव) साहेब असं सांगून तिलाच शासकीय विश्रामधामावर नेले. एका खोलीतील कोचावर तिला बसवले होते. कार्यक्रम आटोपून पंडितजी व मामा बंगल्यावर आले. ते तडक आईच्या खोलीवर गेले. आई उभी राहू लागली तसे धावत धावत पंडितजी आईजवळ गेले. तिचे हात हातात घेतले व म्हणाले, ‘‘बैठिये माँ, मै सिर्फ आपके दर्शन के लिए आया हूँ।’’

‘‘१९३० मध्ये मामा शिकत होते. त्या वेळी त्यांच्या शाळेला गव्हर्नरने भेट दिली. त्याचा निषेध म्हणून मामांनी आवारात तिरंगा फडकावला. मामांना अटक झाली. प्रकरण खूप चिघळले. माफी मागून सुटका करून घेण्याचाही सल्ला मिळाला. यावर आईने जाऊन सांगितले, ‘‘आपलं काय व्हायचं असेल ते होऊ दे, पण तू मुळीच माफी मागू नकोस.’’

‘‘आईच्या घरी दारिद्र्याचा मुक्काम. मामांच्या राजकीय हालचाली काही वेळा त्रासदायक होत. अशा वेळी मामा वैतागत.’’ माझ्यामुळे त्रास होत असेल तर मीच घरात येत नाही. असे सांगून बाहरे पडत. मात्र आई वणवण हिंडून त्यांचा शोध घेत असे. त्यांना घरी आणून भरवत असे. ते जेवीपर्यंत स्वत: कधी घास घेत नसे.

 ‘‘आईला या धाकट्या मामांच्या हालचालीबद्दल नेहमीच एका त-हेचे कुतूहल होते. भोवताली अनेक मित्रांचा मेळावा पाहून तिला अभिमान वाटत असे. मोठी माणसेही त्यांचा सल्ला घेताना पाहून तिला आश्चर्य वाटे. ती घरात सर्वांना बजावे, ‘‘तो काय करतोय ते त्याला करू द्या. काही वाईट करीत नाही.’’ मामांच्या कोणा मित्राला अटक झाली, की साहजिकच त्यांच्या घरात चिंतेचे वातावरण निर्माण होई. आई तातडीने त्यांच्या घरी जाई आणि घरातल्यांना धीर देई.

‘‘१९४३चा एक प्रसंग आजही आठवतो. मामा अटकेत होते. त्यांना भेटण्यासाठी आईला घेऊन मी सातारला गेलो. जिल्हाधिकारी कचेरीच्या एका बराकीत मामांना जेलमधून आणले. त्यांच्या हातात बेडी व पोलिसांच्या हातात तिची दोरी, हे पाहून आईचे मन कळवळले. आईकडे पाहून मामांच्या मुखातून शब्द फुटले नाहीत. दोघांनीही एकमेकांकडे साश्रू नयनांनी पाहिले व सद्गदित अंत:करणाने एकमेकांचा निरोप घेतला...