मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३२-२

कुठेतरी भजी तळल्याचा खमंग वास आला. काकांनी भजांची नुसती आठवण काढली, परत बंगल्यावर जाऊन बाहेर खुर्च्या टाकून बसेपर्यंत तार्इंनी कुणाकडून तरी तिथले भजी भरलेले ताट आणले. मग काका सांगू लागले, ‘लहानपणी शाळेत असताना दादा (काकांचे थोरले बंधू) कराडच्या कोर्टात बेलीफ होते. मी शाळा सुटली की, सरळ दादांकडे जायचो, मग दादा मला जिरंग्याच्या हॉटेलमध्ये नेऊन भजी देत असत. मला तर भजी खायची सवयच लागली होती. त्यामुळे भजी तळतांना वास आला की, तोंडाला पाणी सुटते, दादांची आठवण येते.’

सातारला जिल्हा परिषदेत माझे मिस्टर सभापती असता फिरतीवरून आल्यावर अचानक आजारी पडले. कावीळ झाली. डॉ.पांगरेंच्या हॉस्पिटलमध्ये ठेवले. रोज मला व डॉक्टरना काकांचे फोन येत. एके दिवशी उचकी लागली ती थांबेना, पावसाळ्याचे दिवस होते. काकांनी पुण्याहून डॉ.ग्रँटना रात्री नऊ वाजता पाठवून दिले आणि दुसरे दिवशी भेटायला येतो असा निरोप पाठवला. मी अगदी गोंधळून गेले होते पण काकांनी मला धीर दिला.

माझी दोन तीन वेळा अचानक ऑपरेशन्स झाली. काका दिल्लीत. त्यांचे खाण्या-पिण्यावर लक्ष नसायचे. घरात बसून फोनवर सारखी माझी चौकशी करावयाचे, आणि ताबडतोब मला कसे भेटता येईल हे ठरवायचे. मला भेटून मी आजारी असल्याचे कळल्यापासून त्यांची काय अवस्था होत होती हे सांगत बसायचे. मी ऑपरेशनमधून बाहेर आल्याचे कळले की त्यांना समाधान वाटायचे. मला ते ताबडतोब महिना पंधरा दिवसाच्या विश्रांतीसाठी आपल्याबरोबर घेऊन जायचे.

गेल्या वर्षी काकांची व माझी शेवटची भेट मुंबईत झाली. आम्ही दोघेही मुंबईला गेलो होतो. मुलीच्या घरी थांबलो होतो. काका मुंबईत आल्याचे समजल्यावर मी व माझा भाऊ अशोक, काकांना भेटण्यास रिव्हेरावर गेलो. काकांशी मी तासभर गप्पा मारल्या. हे एकटेच काकांना नंतर भेटायला येणार होते, अशोकने माझी थट्टा केली. काका एकदम मोकळेपणाने खळखळून हसले. ते त्यांचे माझ्या डोळ्यासमोर शेवटचेच हसणे ठरले. मला म्हणाले, ‘‘तुझ्या मुलाची काळजी करू नकोस, तो माझ्याजवळच दिल्लीला आहे.’’ दुसरे दिवशी काका दिल्लीला गेले, आम्ही कराडला आलो आणि दोनच दिवसात काका आजारी असल्याची बातमी रेडिओवर ऐकली ! फोनने चौकशी करेपर्यंत ते आम्हाला सोडून गेले होते ! मला आकाश कोसळल्यासारखे झाले !