‘‘मॅन ऑफ क्राइसीस’’ हा यशवंतरावांचा मी लिहिलेला चरित्रग्रंथ मुंबईत प्रकाशित करण्याचे ठरले. जयप्रकाश नारायण यांचे हस्ते त्या ग्रंथाचे प्रकाशन झाले. त्या वेळी जयप्रकाशबाबूंनी यशवंतरावांच्या कर्तृत्वाबद्दल ते गौरवोद्गार काढले ते ऐकून ती तृप्त झालो.
यशवंतराव १९४६ पासून मंत्री, मुख्यमंत्री म्हणून पंधरा वर्षे सत्तास्थानावर असताना सत्तेचा दुरुपयोग झाल्याचे एकही उदाहरण सापडणार नाही. आर्थिकदृष्ट्या स्वत:च्या स्वार्थाच्या संदर्भात त्यांचा अलिप्तपणा इतका होता की केवळ तीनचारशे रुपयात कराडचा एकत्र कुटुंबाचा व्याप सांभाळत होते. दोन्ही ठिकाणच्या खर्चाने त्यांची होणारी ओढाताण मी अनेकदा पाहिली आहे. एकसष्ट साली त्यांच्या मोठ्या पुतण्यास मुलगी पाहण्यास वाळवे तालुक्यातील ऐतवडे गावी मी गेलो होतो. त्यांचा पुतण्या मुंबईत कुठेतरी नुकताच नोकरीला लागला होता. मलाही ते पुरेसे माहिती नव्हते, त्यामुळे मला काही सांगता आले नाही. मुलीच्या आईने विचारले, ‘‘त्यांची जमीनजुमला किती? त्यांचे उत्पन्न काय? राग मानू नका चुलता मंत्री असला तरी, चुलताचुलतीने त्याला घराबाहेर काढलं तर माझी मुलगी कशी राहणार याची काळजी मला केली पाहिजे.’’ खेडेगावातील एका अशिक्षित शेतक-याच्या बायकोने केलेली ही चौकशी आहे. योगायोगाने त्या गावाजवळच्याच चिखलीचे एका मोठ्या कार्यकर्ताची रुपवती कन्या यशवंतरावांची सून म्हणून आली. मग मात्र मी मामासाहेबांना थोड्या संतप्तपणेच विचारले, ‘‘तुम्ही इतका अलिप्तपणा ठेवता हे बरोबर नाही. पुतण्याचे कुटुंब चालेल एवढा व्यवसाय त्यांना करून देणार आहात की नाही?’’ मला काही उत्तर दिले नाही, पण पुतण्यांना त्यांचे पायावर हळूहळू उभे करणेचा प्रयत्न त्यांनी केला. एकजण - राजा चांगला शिकला, त्याला डॉक्टर केला. मामासाहेबांना त्याचेबद्दल फार समाधान होते.
माझी पत्नी सौ. लीलाबाईचे तिन्ही धाकट्या भावांची लग्ने आम्हा दोघांचे मध्यस्थीने अनुरुप अशी झाली. त्या बाबतही मामासाहेब समाधानी होते. वरील ऐतवड्याच्या प्रसंगानंतर मला वाटायचे मामासाहेबांनी मुलांचेसाठी काहीतरी जमीनजुमला करावा. त्यांच्या मोठ्या भावाला जमिनीची हौस होती. ते तर एकदा मध्यप्रदेशात शेती करण्यासाठी गेले होते. मामासाहेबांनी जमीनजुमला करणेचा विचार सतत बाजूला ठेवला होता. त्याला अपवाद फक्त मित्रांचे आग्रहाखातर उरळीकांचन येथे सौ. वेणूताई चव्हाण यांचे नावे घेतलेली नऊ एकर जमीन ! माझा मोठा मेव्हणा अशोक जमीन घेतो आहे असे म्हटल्यावर त्यालाही त्यांनी विरोध केला.
मी नोकरीचा राजीनामा देताना पाटसला जमीन घेतली होती. त्या जमिनीशेजारी १२-१३ एकर जमिनीचा व्यवहार मी साहेबांचे नावे परस्पर ठरवला. आणि माझे स्नेह्याचे कुटुंबाचे नावे त्या जमिनीची खरेदी केली. त्यांचे एका पुतण्याला व्यवसायाचे काहीच साधन नव्हते. म्हणून १९८० सालात एका सकाळी कुणालाही माहीत नसता साहेब माझे जमिनीवर तासभर आले. त्यांनी अशोकने परभारे व्यवहार केलेली जमीन पाहिली आणि त्या पुतण्याचे नावे ती जमीन करणेस संमती दिली. दैवदुर्विलास असा की त्या जमिनीची ट्रान्सफर ते असताना झाली नाही. अगदी या महिन्यातच तो व्यवहार पुरा झाला.
त्यांचा अधिक लाडका पुतण्या डॉ. राजा याच्या अपघाती निधनानंतर मामासाहेब अगदी खचून गेले होते. त्यातच काळाने सौ. वेणूतार्इंवर झडप घातली. मामासाहेब अगदी पुरते खचून गेले, सतत डोळ्यांतून अश्रूधारा, विमनस्क अवस्था. सौ. वेणूताई असताना दिल्लीच्या राजकारणाचा उबग येऊन कराडला ‘‘विरंगुळा’’ निर्माण केला होता. सौ. वेणूतार्इंनंतर त्यांचे स्मरणार्थ ट्रस्ट करून दिल्लीतील सर्व काही कराडला हलवायचा निर्णय त्यांनी घेतला होता. आता फक्त ऋषीसारखे विरक्त जीवन आणि समाजाची सेवा ही एकच बाब त्यांचेसमोर होती. प्रथम विरंगुळा बंगल्यातच सौ. वेणूताई चव्हाण स्मारक ट्रस्टची वास्तू उभारणेचा मामासाहेबांचा विचार होता. माझा त्याला विरोध होता. ‘‘विरंगुळा’’ ही चव्हाण कुटुंबाची खाजगी प्रॉपर्टी राहावी असे वाटे. शिवाजीनगर हैसिंग सोसायटी स्थापन करताना मी सार्वजनिक सोईसाठी सार्वजनिक मालकीच्या जागेची भरपूर व्यवस्था केली होती, मी त्या हौसिंसग सोसायटीचा संस्थापकच होतो. तेव्हा शिवाजीनगर सोसायटीचे सोशल क्लबसाठी राखून ठेवलेली १८ गुंठे जागा सौ. वेणूताई ट्रस्टसाठी देणेचा निर्णय घेतला. या घटनेमुळे मामासाहेबांना खूप समाधान वाटले. मामासाहेबांचे विचार, सल्ला देणेचे आणि लेखनाचे काम सुरू झाले की, तेवढाच त्यांना दु:खाचा विसर पडत जाईल असे वाटे. त्यांनी ‘‘कृष्णाकाठ’’ पुरा केला होता. सागरतीर आणि यमुनाकाठ हे खंड पुरे होतील असे वाटले, पण नियतीला ते मंजूर नव्हते, मामासाहेब अवचितच आमचेतून निघून गेले.