मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३२-१

काका दिल्लीला गेले तरी मी माझ्या मुलाबाळांसह वर्षातून एकदा तरी त्यांच्याकडे राहिल्याशिवाय त्यांचे समाधान होत नसे, आणि तेथून निरोप घेताना ते इतके अस्वस्थ होत की, कधीकधी त्यांचे डोळ्यातून अश्रूही येत ! काकांच्या या प्रेमामुळे मला माझ्या आईवडिलांची कधीच आठवण येत नसे. माझ्या धाकट्या भावंडांना तर आईवडील कसे होते हेही माहीत नव्हते. आमचे ताईकाकाच त्यांचे आईबाप होते. काकांनी तसे आमचेवर अखेरपर्यंत प्रेम केले.

आमचे काका महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. एकसष्ट खाली माझ्या दोन्ही मोठ्या भावांची लग्ने ठरली, काकांचे नंतर चव्हाणांचे घरातील मुलांचे हे पहिलेच लग्न, ताईकाकांचा उत्साह एवढा मोठा होता की, लग्नातील प्रत्येक बारीकसारीक गोष्ट त्यांनी स्वत:च्या देखरेखीखाली केली. शिवाजी विद्यालयात भला मोठा टोलेजंग मांडव घातला होता. हजारो माणसांनी सारे कराड फुलले होते. गव्हर्नर श्रीप्रकाश खास लग्नासाठी आले होते. आईचे (आजी) तो खास सोहळा पाहून डोळ्याचे पारणे फिटले.

गव्हर्नर श्रीप्रकाश यांची एकदा कराडला भेट होती. त्या वेळी ते आमच्या घरी जेवायला येणार होते. त्यांना महाराष्ट्रीय पद्धतीचे जेवण हवे होते म्हणून पुरणपोळीचा स्वैपाक केला होता. श्रीप्रकाशांना काकांचे घर बघायचे होते, त्यांनी (काकांनी) गव्हर्नर आल्यावर गोंधळ करावयाचा नाही, शांतपणानं वागायचे असे आम्हाला सांगितले. आईलाही सांगून ठेवण्यास सांगितले. जेवणखाण झाल्यावर श्रीप्रकाश आईला नमस्कार करू लागले तसे आईने कमरेचा एक रूपाया काढून गुपचूप त्यांचे हातात दिला. ‘‘कुणाला सांगू नका, जा बाबा आता.’’ असे ती म्हणाली. आम्ही आईला ब्राह्मण जेवायला घालतेस तसे वागायचे नाही असे सांगूनही, आईनं गव्हर्नर श्रीप्रकाशनाही तसेच केले. काकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी कसाबसा खुलासा केला, पाहुण्यांना घालवल्यानंतर आम्ही काका, आईची खूप थट्टा करीत हसत राहिलो.

आमची आई बाळबोध वळणाची होती. ती कराडला राहणे पसंत करी. काका मंत्री असताना क-हाडला आले की, घरात राजकारणाच्या गप्पा रात्ररात्र चालत. एकदा रात्री अकरा वाजता आई बाहेरच्या दाराजवळ आली तर बाहेर पोलिस पहारा करीत असल्याचे तिला दिसले. आईने त्यांना विचारले, ‘‘का उगाच ताटकळत उभे राहिलाय? झोपा की आता?’’ आणि घरात येऊन मला सांगितले,  ‘‘पोलिसांना सतरंजी, उशी नेऊन दे, त्यांना झोपू दे.’’ आईचे हे आत बाहेर सुरू असता, काका बाहेर आले आणि चौकशी केल्यावर पोलिसांना म्हणाले, ‘‘आमची आई तुम्ही झोपल्याशिवाय झोपणार नाही, तुम्ही झोपा.’’ साहेबांनी सांगितले म्हणून पोलिस झोपले. नंतर रात्री एक वाजता इन्स्पेक्टर राऊंडला आले असता, पोलिसांना लाथा मारून उठवू लागले व बडबडू लागले, ‘‘अशीच ड्यूटी करता का?’’ काका बाहेर आले, त्यांना बाहेर काही तरी गडबड चालली आहे हे कळले, त्यांनी बाहेर येऊन फौजदाराला सांगितले, ‘‘पोलिसांची काही चूक नाही, आमच्या आईला पोलिस उगाच ताटकळत बसलेत असे वाटले, पोलिस झोपल्याशिवाय ती झोपणार नाही म्हणून मीच पोलिसांना झोपावयास सांगितले.’’ आई अनेकवेळा काकांना भेटायला, काम सांगायला आलेल्या माणसांना घेऊन त्यांच्या कामाबद्दल आग्रह धरत असे. काकांना त्यांचे काही वाटत नसे. पण आईला हा त्रास होत असे, म्हणून काका लोकांना आईला त्रास न देण्याबद्दल सांगत.

आमच्या काकांच्या डुबल आळीतील जुन्या घरात बैठकीची खोली अगदी भारतीय पद्धतीची असायची, तीन चार गाद्या, दहा बारा तक्के ठेवलेले असत. घरातही आम्ही सारी जमिनीवर अंथरूण टाकूनच झोपत असू. कॉट वगैरे काही नव्हते. साधी खुर्ची टेबलही नव्हते. एकदा काकांचा कराडला मुक्काम असताना, डी.आय.जी.कामटे काकांना घरी भेटायला येणार होते, काकांना काय वाटले कुणास ठाऊक पण घरात एकदम म्हणाले, ‘‘पोलिस खात्याचा मुख्य साहेब येतोय, त्यांना बसायला एखादी खुर्ची तरी आणा.’’ मग धावपळ करून समोरच्या वाड्यातील एक खुर्ची आणून ठेवली. आम्हाला मोठी गंमत वाटली.

एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीत काकांचा मुक्काम महाबळेश्वरला होता. आम्हा सा-या मुलांनाही तेथे आणले होते. काका बाहेरच्या लोकांच्या भेटीगाठी बंद करून घरातल्या सर्वांशी गप्पागोष्टी करण्यात एखादा दिवस घालवत. प्रत्येकाची चौकशी करीत. पाठीमागच्या आठवणी काढून थट्टामस्करी होत असे. संध्याकाळी काकांचेसह आम्ही तळ्याच्या बाजूला फिरायला गेलो.