मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३३-१

मामांच्या सांगण्यावरून किसन वीरांकडे कवठ्याला पिस्तुल, काडतुसं व पत्र पोहोचतं करायचं होतं. कवठ्याला कसं जायचं हे ठाऊक नव्हतं. वाठार स्टेशनला पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती. एक ट्रक त्या बाजूकडे निघाला होता. जोश्यांच्या विहिरीकडे सोडायला त्याला विनवलं. ५-६ मैलांवर शिरगावच्या घाटात गाडी बंद पडली. सरळ उतरून चालायला सुरूवात केली. २-३ फर्लांगावर घुंगराचा आवाज ऐकू येऊ लागला. बैलगाडी येत होती.

गाडीवानाने चौकशी केली. किसन वीरांकडे जायचे आहे हे कळल्याबरोबर आपल्यापैकी एकजण बरोबर दिला. सामान्य गाडीवानापर्यंत चळवळ कशी पोहोचली होती त्याचं प्रत्यंतर आलं. पिस्तूल, काडतुसं किसन वीरांकडे पोहोचती केली. रात्री भुर्इंजला बैठक होती. ती आटोपल्यावर परत फिरलो. आल्यावर पाठीवर थाप पडली....

कराडची चावडी जाळण्याचा कार्यक्रम पार पडला होता व आता शिरवड्याचे स्टेशन जाळण्याचा निर्णय घेतला होता. तांबवे, कराड कुंडल चरेगाव असे ४ कार्यकर्ते जमले. अंधार पडला. कासेगावकर वैद्य, सदाशिवराव पेंढारकर पुढे झाले. स्टेशनमास्तरला संशय आला. त्याने कराडला फोन केला. तोवर आम्ही धाड घातली होतीच. ७ बंदूका मिळाल्या. मी, बाबूराव काळे, शांताराम इनामदार, गजानन पावसकर, गणपतराव चव्हाण, बभ्रुवाहन जाधव, माधवराव पवार आदी मंडळी बंदुका घेऊन निघालो. पोलीस वाटेत गाठणार या भीतीने वाटेतच एक खड्डा खणला, माती टाकली व परेड करीत कोपड्र्यातून बाहेर पडलो व सैदापूर गाठले. दुस-या रात्री जाऊन बंदुका आणल्या.

शांतारामबापू इनामदारांबरोबर पुण्याला जायचे होते. मामा तिथे लॉजवर गुपचूप उतरले होते. मी मामांना भेटून आल्याचा सुगावा पोलिसांना लागताच मला अटक केली. २७ दिवस छळ करण्यात आला. जीव गेला नाही एवढेच! कमरेच्या वरचा भाग फोडून निघाला होता. मामांचा पत्ता मी सांगत नव्हतो. एवढ्यात शिरवड्याचा खटला सुरू झाला. त्या वेळी १८ वर्षाखालच्या पोरांना केनिंगची शिक्षा असे. त्या जबर शिक्षेमुळे अपंगत्व येत असे. साहेबांचा निरोप मिळाला. वय जास्त लावून द्या. तसं केलं. पुणे, विसापूर, शहापूर अशा तुरूंगातून डांबण्यात आलं.

आम्ही २४-२५ आरोपी खटल्याच्या वेळी जेलमधून कोर्टाकडे जाताना गाणी गात असू. महात्मा गांधींच्या घोषणा देत असू. आमची केस शिराळकर वकिलांकडे होती. वाटेत लोकांनी आम्हाला देऊ केलेले पेढे, बर्फी पोलिस घेऊ देत नसत. कोर्टापुढे शिराळकरांनी ही गोष्ट नजरेला आणून दिली. पुढे आमच्या पोटाचा प्रश्न तुरूंगात असताना सुद्धा अशा प्रकारे सुटला. लोकांच्या मनात पेटलेली इर्शा व स्वातंर्ताची ऊर्मी अशा अनेक प्रसंगांतून अनुभवण्यास येत होती.