मी पाहिलेले यशवंतराव -प्रकरण - १३३

१३३. मंतरलेले अनुभव  - श्री बाबूराव कोतवाल

माझे सारे पालनपोषण मामांनी केले. मामांच्या घरातूनच लहानाचा मोठा झाल्यामुळे मामांना जवळून पाहण्याची संधी मला मिळाली.

ते दिवस काँग्रेस सेवादलात जाण्याचे होते. मी १० वर्षांचा होतो. १९३९-४० साली काँग्रेसचे प्राथमिक सदस्यत्वाची नोंदणी करण्याचे काम सुरू होते. मामांना म्हणालो, ‘‘मी सभासद करतो. मला पुस्तक द्या.’’ ४ आणे सभासद फी होती. सभासद करण्याचे मामांना सांगून बसलो होतो. ५ करता करता पंचाईत झाली. शेवटी ५ सभासदांची वर्गणी सव्वा रूपया मामांकडे सुपूर्द केली. शाबासकीची पहिली थाप पाठीवर पडली.

इंग्रजी ४ थी मध्ये असताना समजले की, मामा ए.आय.सी.सी. मध्ये गेले आहेत आणि चळवळीचे रणशिंग फुंकले आहे. आम्हीही त्यात सामील व्हावयाचे ठरविले. काँग्रेसच्या नेत्यांमागे इंग्रजांचा ससेमिरा सुरू झाला. मामा कराडला येणार असल्याचे समजले. बाबुराव काळे, गजानन पावसकर अशी आम्ही मंडळी गुपचूप स्टेशनावर गेलो. बाळकृष्णबुवांचा मठ आहे तेथे मामांना आणून ठेवले.

म.गांधी, नेहरूंना अटक झाली. काय करायला हवे ते ठरविले. शांताराम बरड, जयंती गुजर यांनी शाळा सोडावी असे ठरविले. मग बुलेटिन्स काढली. टेलिफोन्सच्या तारा तोडणे, सरकारी मालमत्ता लुटणे वगैरे कार्यक्रम ठरविले. मामा भूमिगत होते. कराडवरून ढेबेवाडी रस्त्यावर विंगाचे पाण्याची टाकी होती तेथे लपून बसलो. टपालाची पिशवी घेतली व आगाशीनगर डोंगर चढलो. मनिऑर्डरचे १४५ रूपये मिळाले. ते घेऊन जखीनवाडीला आलो. तोपर्यंत पोलिसांचा फोन गेला होता. कार्वे, कोरेगाव, टेंबू करीत परतलो. पैसे मामांच्या स्वाधीन केले. मामांनी कार्यकर्त्याची विचारपूस केली व पैसेवाटप केले. कार्यकर्त्यांबद्दल अपार प्रेम व आपुलकी हे मामांचे मोठेच वैशिष्ट्य होते.

कामेरीचे के.डी.पाटील याचेकडे चळवळीला दिशा देण्यासाठी बैठक होती. परतताना केडींनी साहेबांना सायकल दिली. साहेब सायकलवरून परतले. सायकल कामेरीला नेण्याचे काम माझेवर आले. एक पत्रही मामांनी दिले होते. पत्र इंग्रजीत होते. वाटेत उत्सुकतेने वाचले. एक वाक्य कायमचे घर करून बसले आहे. ‘‘आपण अत्यंत सुखरूप पोहोचलो.’’ असे मामांना सांगायचे होते.

कराडमध्ये मोठा मोर्चा आयोजित करायचे ठरविले होते. पत्र घेऊन बाळासाहेब उंडाळकरांकडे जायचे होते. मोर्चा निघाला. तांबवे, इंदोली, वगैरे भागातूनही लोक आले होते. बाळासाहेब उंडाळकरांना अटक करण्यात आली. मामांच्या कानावर घातले, तेव्हा ते ओगलेवाडीच्या व्यंकटराव ओगल्यांकडे राहात असत. पुसेसावळीला जायचे होते. बैलगाडी व गाडीवान घेऊन निघालो. शामगावच्या खिंडीत गाडी वेडीवाकडी होत होती. गाडीत बसायला भीती वाटत होती. मामा उतरून पायी चालत होते. मला गाडीत बसवेना. मामांनी खांद्यावर घेतलं आणि वाघेरीपर्यंत आणलं.

मोर्चा झाला, गोळीबार झाला, त्यात अनेकजण मृत्यूमुखी पडले. त्यांच्या मृत्यूची माहिती घ्यायला आयाचित वकिलांकडे मला पाठविले. अंधार पडता पडता आयाचित वकिलांच्या घरासमोर उभा राहिलो. पोलिसांची नुकतीच धाड पडली होती. आयाचितांना अटक झाली होती. नानासाहेबांना भेटायला मी आलोय हे कळल्याबरोबर त्यांचे वडील घाबरले. मला गंजीआड लपायला लावलं. पहाटे तीन-साडेतीन वाजता औंधांच्या रायगावकर देशपांडे यांच्याकडे जायचं होतं. आता फार काळ मला इथं ठेवून घेणं धोक्याचं होतं. पहाटेची वेळ होती. रस्ता ठाऊक नव्हता. औंधाचा हत्ती दिवा वडूजला निघाला होता. अंधारात घंटेचा आवाज व प्रकाशणारा दिवा पाहून मला भीती वाटू लागली. जसजसा आवाज जवळ येऊ लागला, तसतसा मी घामाने डबडबत होतो. भुताच्या भीतीने बोबडी वळली होती. गलितगात्र होऊन खाली पडलो. हत्तीबरोबरच्या म्हाता-याने मला उठवलं, चौकशी केली, पाणी पाजलं, रायगावकर देशपांड्यांकडे जायचं आहे असे त्याला समजल्यावर त्याने आपल्या पोराला मैल, दोन मैल रस्ता दाखवायला सांगितले. रायगावकर देशपांड्यांच्या घरात पोहोचलो आणि समजलं त्यांची दोन्ही मुले गोळीबारात जखमी झाली आहेत. पाय वळले होते. तरी फार काळ तिथं थांबणं बरोबर ठरले नसते. माहिती गोळा केली. औंधावरून रहिमतपूर करीत कराड गाठले. मामांना हकिकत सांगितली. कार्यकर्त्याकडे पैसे पोहोचते करण्यात आले.