दुसरा प्रश्न नक्षलबारीचा. तो हाताळण्यासाठी कणखरपणा, समजूतदारपणा दाखवायला हवा होता. नक्षलबारी हे असंतोषाचे प्रतीक होऊ पाहात आहे, संबंधितांनी नमुन्यासाठी सुरू केलेला तो एक राजकीय प्रयोग होता. जिथे काँग्रेस पक्षाचे सरकार नाही, अशा राज्यात तो घडत असल्याने त्याच्याशी संबंध येणे ही एक नाजूक बाब होती. लोकांना वाटत होते, की काँग्रेसेतर सरकारशी आमचे वर्तन पक्षपाती असेल. पण मला पक्षापेक्षा देश मोठा वाटतो. त्या देशातल्या लोकांची इच्छा ही सार्वभौम आहे, हे एकदा मान्य केल्यानंतर त्यांच्या निर्णयाचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून नक्षलबारीच्या प्रश्नाकडे मी संकुचित पक्षीय दृष्टीने पाहात नव्हतो. कायदा व सुव्यवस्था यांचे रक्षण करण्यापुरता माझा संबंध होता. नक्षलबारीत त्यालाच धोका आहे, हे जेव्हा दिसून आले, तेव्हा कार्यवाही करणे जरुरीचे होते. काँग्रेसपक्षीय या नात्याने सामाजिक न्याय व समता या तत्त्वांवर समाजाचे स्थित्यंतर घटनात्मक मार्गाने केले पाहिजे, यावर माझी श्रद्धा आहे. कदाचित घटनात्मकतेचे हे बंधन पडल्यामुळेच गेल्या वीस वर्षांत अशा स्थित्यंतराच्या दिशेने भारतात पुरेशी प्रगती झाली नसेल. पण शोषक वर्गाचे हितसंरक्षण आम्हांला करावयाचे नव्हते. नक्षलबारीतही आम्हांला विशिष्ट वर्गाचे रक्षण करायचे नव्हते. आम्हांला रक्षण करायचे होते, शांततेचे. बंगाल सरकारला मी सवाल केला, तो हाच, की सामाजिक स्थित्यंतरासाठी जे तुमचे कार्यक्रम ठरले असतील, ते आता घटनात्मकरीत्या अमलात आणण्याची संधी आली आहे. तिचा फायदा तुम्ही घेतला पाहिजे. पण बंगाल सरकारमध्ये सहभागी झालेल्या पक्षांनी त्या सरकारवर अशा तऱ्हेचे दडपण आणले नाही. संसदीय मार्गांनी जमिनींचा प्रश्न न सोडविता तो दहशतीने सोडविण्यास एका पक्षाने प्रोत्साहन दिले. नक्षलबारीत हिंसात्मक सामुदायिक आंदोलन करण्याचे प्रयत्न झाले. जेथे सरकारच तुमच्या हाती आहे आणि जनतेला स्थित्यंतर हवे आहे, तेथे हिंसा कशाला, अशी माझी भूमिका होती. माझ्या मते नक्षलबारीच्याद्वारे 'माओवाद' या देशात आणण्याचा प्रयत्न झाला. सरकारच अशा प्रयत्नात सहभागी झाले, तर देशहिताच्या दृष्टीने आम्ही स्वस्थ बसून चालेल काय, हा आमच्यापुढे खरा प्रश्न होता. देशाच्या सीमेवर माओवादाचा नंगानाच आणि देशात त्याचे अनुकरण ही व्यूहरचना कोणत्याही परिस्थितीत फोडली पाहिजे. ती देशहिताच्या दृष्टिने घातक आहे. मला वाटते, लोकमत माझ्या बाजूने आहे.
मला वाटते, की भारतीय समाजाची मानसिक घडणच अशी आहे, की त्याला कोणताही बदल उत्कटतेने हवा आहे, असे वाटत असले आणि त्यासाठी तात्कालिक उद्रेक जरी निर्माण झाले, तरी त्याला हा बदल शांततेने व्हावासा वाटत असतो. १९६७ च्या निवडणुकीचे निकाल हे भारतीय समाजाच्या मानसिक घडणीचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
मला त्यावेळची माझी मन:स्थिती आठवते. गृहमंत्री या नात्याने त्या निवडणुका शांततेने व्हाव्यात, याची काळजी मला घ्यावयाची होती. या निवडणुकी शेवटच्याच ठरतील, अशी अभद्र भाकिते वर्तविली जात होती. पण जे घडले आहे, ते सर्व जगाने पाहिले आहे. राजकीय समज किंवा योग्य तो निर्णय घेण्याची क्षमता ही काही साक्षरतेवर अवलंबून नसते. मला वाटते, शिक्षणानेही एक प्रकारचा मनोगंड येतो, न्यूनगंड येतो. आपले समाजाच्या अंतर्मनाशी असलेले संबंध सुटतात. बावळ्या वेशातील फाटकी वस्त्रे घातलेली, दीन दिसणारी माणसेही प्रचंड धक्का देऊ शकतात, राजवटी कोलमडवू शकतात, राज्यकर्त्यांना व राजकीय पक्षांना धडा शिकवितात, हे लोकशाहीचे सामर्थ्य आहे. भारतीय जनतेने ते सिद्ध केले आहे. आणि हे सारे शांततेने घडवून आणले, याचा मला अभिमान वाटतो. म्हणूनच माझा जनतेवरील व लोकशाहीवरील विश्वास दुणावला आहे.
आपल्या देशाला त्याच्या विशालतेचा विसर पडेल, विशाल स्वप्ने जाऊन तिथे संकुचित भावना रुजतील, की काय, याच गोष्टींची मला काळजी वाटते. भारत हा प्रचंडकाय देश आहे. तेच त्याचे फार मोठे सामर्थ्य आहे. जागतिक राजकारणात आपल्याला त्यामुळेच प्रतिष्ठा लाभलेली आहे, हे आपण विसरलो, तर हा देश निष्प्रभ होईल. हिमालयाची उत्तुंगता, सागराची खोली व विशालता, भारताच्या नद्यांतून अखंड वाहात असलेली एकच उदात्त उदारतेची परंपरा, मंदिरांत तेवणारे नंदादीप व मशिदीमशिदींतून भल्या पहाटे ऐकू येणारी बांग हे भारताचे व्यक्तिमत्त्व आहे. मला वाटते, त्याचा विसर या देशाला पडू नये. तो विसर पडला नाही, तर हा देश खरोखरच महान होईल, हा माझा विश्वास आहे.