अशा या वैचारिक गोंधळातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसचे पुन:संघटन होणे आवश्यक आहे. निवडणूक निकाल लक्षात घेता काँग्रेसला आत्मटीका जरूर केली पाहिजे, अंगभूत दोष दूर केले पाहिजेत आणि जनतेच्या भावनांचे व आकांक्षांचे प्रतिबिंब काँग्रेस संघटनेत अधिक उमटले पाहिजे, यात मुळीच शंका नाही. काँग्रेसच्या मूलभूत धोरणाशी तडजोड सुचविणारी कोणतीही योजना मला मान्य नाही. गेल्या ८०/९० वर्षांच्या काळात काँग्रेसने राजकीय, सामाजिक व आर्थिक विचारांची एक निश्चित दिशा निर्माण केली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात नवनिर्माणाच्या अनेक योजना आखल्या आहेत आणि एका विशिष्ट दिशेने पुरोगामी वाटचालही सुरू केली आहे.
या पार्श्वभूमीवर, निवडणुकीत काही प्रमाणात पराभव पत्करावा लागला, या एकमेव कारणासाठी जनसंघ वा स्वतंत्र पक्षाशी पक्ष या नात्याने सहकार्य करणे सुसंगत ठरणार नाही. या दोनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांबाबत माझ्या मनात अतीव आदर आहे. परंतु व्यक्तिगत लोभ वा आदरभावनेचा उपसर्ग पक्षाच्या तत्त्वज्ञानाला पोहोचू नये, या मताचा मी आहे. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहता हे दोनही पक्ष 'जैसे थे' (Status Quo) वादी आहेत. खास करून आर्थिक पुनर्रचनेच्या बाबतीत स्वतंत्र पक्ष राजकीय दृष्ट्या समाजातील उच्च व वरच्या थरातील समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहे आणि म्हणूनच प्रतिगामी आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील स्वतंत्र पक्षाची विचारसरणी पाश्चिमात्यांकडे झुकलेली आहे, तर जनसंघाचे स्फूर्तिस्थान पुराणमतवादी विचारसरणीत आहे. अशा पक्षांशी काँग्रेससारखा गतिमान व पुरोगामी पक्ष सहकार्य करू शकेल काय? याचे उत्तर 'नाही' असेच द्यावे लागेल. इतिहासाकडे पाठ फिरवून आत्मघाताला सिद्ध होण्याचाच तो एक प्रकार ठरेल.
प्रजासमाजवादी पक्षाशी सहकार्य करण्याची कल्पना मात्र निश्चितपणे विचार करण्याजोगी आहे. अर्थात दोन्ही बाजूकडील प्रमुखांत वैचारिक देवाणघेवाण कितपत होते व दोन्ही पक्ष एकमेकांशी सहकार्य करण्यास कितपत उत्सुक आहेत, यांवरच सारे अवलंबून आहे. व्यावहारिक अडचणी बाजूला सारता आल्यास, तत्त्वत: या दोन पक्षांत वैचारिक मतैक्य असल्याचेच दिसून येईल.
भारतीय राज्यघटनेने राज्यांना दिलेली स्वायत्तता देशातील फुटीर प्रवृत्ती वाढीला लावील, असे मला वाटत नाही. सध्याची स्वायत्तता राज्यांना व केंद्रांना सारख्याच प्रमाणात परस्परपूरक ठरणारी आहे. केंद्राला दुर्बल करणे एवढाच जर काही हितसंबंधियांना अभिप्रेत असलेला स्वायत्ततेचा अर्थ असेल, तर तो अनर्थकारी आहे, असेच मानावे लागेल; पण भारताच्या घटनाकारांनी या सर्व बाबींचा विस्ताराने व खोलवर विचार करूनच स्वायत्ततेच्या कक्षा निश्चित केल्या आहेत. अर्थात या कक्षांमागील भावना समजावून घेतली पाहिजे. एवढे पथ्य पाळल्यास केंद्रात वा राज्यांत कोणत्याही प्रकारची सरकारे स्थापन झाली, तरी जगन्नाथाचा हा रथ योग्य मार्गानेच मार्गक्रमण करील.
चारित्र्यहननाची कल्पना केवळ लोकशाहीशीच विसंगत आहे, असे नसून, व्यक्तिगत जीवनात पाळावयाच्या शिष्टसंमत संकेताशीही ती विसंगत आहे. आणि म्हणूनच हा मार्ग केव्हाही त्याज्य व निषेधार्हच आहे. सभ्यतेच्या मर्यादा ओलांडणारा हा प्रकार हिडीस व ओंगळवाणा आहे. असे प्रकार थांबलेच पाहिजेत.