८. भारताची सद्यःस्थिती – एक चिंतन
‘केसरी’ (१९६८) दिवाळी अंकातील लेख
भारताची राजकीय सद्य:स्थिती अनेकांना अस्वस्थ करते. तशीच ती मलाही चिंताग्रस्त करते. विशेषत: स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतलेले किंवा त्या उत्तेजक, स्वप्नरंजक वातावरणात वाढलेले नेते अस्वस्थ होतात. कारण एका भव्य स्वप्नाच्या पूर्तीसाठी झगडत असताना दिसलेली बेहोशी आता कुठे दिसत नाही. उलट अधिकारांची वा हक्कांची चर्चा सर्वत्र होते. विमानातून जाताना दिसणारे नद्या-पर्वतांचे रूप मोहक असते, पण प्रत्यक्ष त्या नद्या-पर्वतांसमोर आपण उभे राहतो, तेव्हा ते दुर्लंघ्य वाटू लागतात. वाटते, की ती मोहकता हा एक भास होता. आपले तसेच झाले आहे. १९४२ साली भारतीय क्रांतीसाठी लढत असताना काही स्वप्ने तरळत होती आणि अगदी अचानकपणे १९४७ साली आपल्याला या देशाचे राज्य करण्याची सुवर्णसंधी मिळाली. त्यावेळी स्वातंत्र्याची पहाट फुटताना नेहरू म्हणाले होते, की भारत आता नियतीची भेट घेण्यासाठी (tryst with destiny) मुक्त झाला आहे. एक स्वप्न साकार झाले होते. दुसरे स्वप्न देशाला देण्याची गरज होती. नेहरूंनी ते दिले. ते स्वप्न आपल्या नियोजनात दिसले. ज्या क्रांतीचा उद्घोष आपण करीत होतो, तिच्यातील प्राणतत्त्वे, तिच्यातील स्फुरणे आपल्या राज्यघटनेत समाविष्ट झाली. आंतरराष्ट्रिय जगात भारत आपल्या शांतिप्रेमावर आधारलेली तत्त्वनिष्ठ भूमिका घेऊन उभा राहिला. मला वाटते, अव्यक्त भारतीय क्रांतीची ही व्यक्त रूपे होती.
ही क्रांती शांतपणे घडत होती. त्यामुळे तिच्याकडे लोकांचे पुरेसे लक्षच गेले नाही. रक्तरंजित आर्थिक क्रांतीत दिले जाणारे मानवी प्राणांचे मूल्य आपण दिले नाही. त्यामुळे आपल्याला वाटते आहे, की या देशात क्रांतीच सुरू झालेली नाही.
ज्या दिवशी आपण अस्पृश्यतेला घटनेत मूठमाती दिली, स्त्रियांना मताधिकार दिला, अल्पसंख्याकांना नागरिकत्वाचे सर्व अधिकार दिले, त्या दिवशी सामाजिक क्रांतीचे नवे पर्व सुरू झाले. आपण कामगारांना न्याय देणारे अनेक कायदे केले, त्या दिवशी आपल्या आर्थिक न्याय देणा-या उद्दिष्टांची पूर्ती करण्यास आपण प्रारंभ केला. जिल्हा परिषदा, ग्रामपंचायती, सामूहिक विकास केन्द्र यांच्याद्वारे ग्रामीण क्रांतीची पायभरणी केली. विज्ञानाचा अभ्यास करणा-या प्रयोगशाळा काढल्या, नवे, अवजड उद्योगाचे कारखाने निघाले. देश संरक्षणक्षम करण्यासाठी संरक्षक साधनांचे कारखाने सुरू केले, ही सगळी भारतातील नव्या वैज्ञानिक युगाची नांदी होती, पण दुर्दैव असे आहे, की परदेशात घडलेल्या क्रांतीच्या उदाहरणांनी आम्ही इतके भारावून गेलो होतो, की आम्ही आमच्या देशात सुरू केलेली क्रांती यशस्वी होण्यासाठी, ती राबविण्यासाठी पुरेसा उत्साह दाखविला नाही. याचा अर्थ गेल्या २० वर्षांत घडले, ते सारे बरोबर होते, चुकाच झालेल्या नाहीत, असे मुळीच नाही. पण आज दिसणारे वैफल्य हे केवळ आपल्या अपेक्षाभंगातून निर्माण झालेले नसून जे सभोवताली घडते आहे, ते आपण नीट समजावून न घेतल्यामुळे आले आहे. त्यामुळे परिस्थिती अगदी निराशाजनक वाटते आणि समाजात दोषदर्शी प्रवृत्तीच वाढत जातात.