५. १९६७ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर
१९६७ मधील एका मुलाखतीच्या आधारे
सार्वत्रिक निवडणुकीतील निकालांचा अन्वयार्थ सांगताना कोणताही एक निश्चित निष्कर्ष काढणे केवळ अशक्य आहे. जनतेला विनाविलंब परिवर्तन हवे आहे, हेच जनतेने मतपेटीच्या द्वारा सर्व पक्षांना दाखवून दिले आहे. जनतेचा कल डावीकडे आहे, की उजवीकडे, याबाबतीतही खात्री देता येणार नाही. या निवडणुकीत काँग्रेसला राज्यविधानसभांमध्ये मोठ्या प्रमाणावर पराभव पत्करावा लागला आहे, हे अगदी खरे. परंतु याचा अर्थ जनतेचा नियोजनाला, निधर्मी राष्ट्राच्या कल्पनेला वा आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील गतमान तटस्थतेच्या धोरणाला विरोध आहे, असे मात्र म्हणता येणार नाही.
मग काँग्रेस पक्षाचा हा पराजय कसा व का झाला? स्थानिक लोकभावना, निर्णयांच्या अंमलबजावणीची अक्षम्य दिरंगाई आणि काही राज्यांत काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाविरुद्धचा राग यांमुळे जनतेने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला आणि काँग्रेसविरुद्धचा राग प्रकट केला.
या निवडणुकीपासून भारतात राजकीय 'पोलरायझेशन'ला प्रारंभ झाला आहे, असे मात्र मला वाटत नाही. तशी भावना निर्माण झाली आहे, एवढेच. परंतु अशा प्रकारच्या 'पोलरायझेशन'ला मी मात्र याक्षणी तरी फारसा उत्सुक नाही. तत्त्वत: नव्हे; व्यावहारिक दृष्ट्या. कारण 'पोलरायझेशन'ची प्रक्रिया याक्षणी सुरू होणे राष्ट्रहिताला बाधक ठरणार आहे, असे मला वाटते. आज आपण राष्ट्रीय विकासाच्या ज्या स्तरावर उभे आहोत, त्याकडे दृष्टीक्षेप टाकता माझे म्हणणे कुणालाही पटावे. कारण अशा प्रक्रियेतून देशात यादवी युद्ध पेटेल, अशी मला भीती वाटते.
याचा अर्थ विविध राजकीय पक्षांनी वेळोवेळी उद्भवणा-या प्रश्नांवर आपापली धोरणे स्पष्टपणे मांडू नयेत, असे नाही. त्याप्रमाणे शांततापूर्ण व घटनेच्या चौकटीत राहून जन-आंदोलने उभारण्यासही माझा विरोध नाही. पण राजकारणात 'पोलरायझेशन' हा शब्दप्रयोग ज्या अर्थाने वापरला जातो, तो अर्थ मला याक्षणी अमान्य आहे. जनतेची डाव्या व उजव्या गटांत विभागणी करणे देशाला परवडणारे नाही.
काँग्रेसचा पराभव मोठ्या प्रमाणावर झाला असला, तरी देशातील जनता निश्चितपणे कोणत्या तत्त्वज्ञानाच्या पाठीशी उभी आहे, हे चित्र अद्यापि स्पष्ट झालेले नाही. मद्रास राज्यात द्रविड मुन्नेत्रा, केरळ राज्यात कम्युनिस्ट नियंत्रित संयुक्त आघाडी आणि उत्तर प्रदेश, बंगाल, बिहारात जनसंघ-कम्युनिस्टांसह बंडखोर काँग्रेसजनांच्या नेतृत्वाखाली संयुक्त दले सत्तेवर आली आहेत.