बंगल्यांची इंग्रजी नावे बदलू या !
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर यशवंतरावांनी अनेक निर्णय घेतले. काही निर्णय मोठे होते तर काही छोटे होते. पण आपला प्रत्येक निर्णय हा महाराष्ट्राला चार पावले का होईना पण पुढे घेऊन जाणारा असला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता.
मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव ज्या बंगल्यात रहात होते त्या बंगल्याचे रिव्हेरा हे नाव इंग्लंडमधील परंपरेशी निगडीत होते. महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातील सामान्य माणसाला ते इंग्रजी नाव उच्चारणेसुद्धा अवघड वाटत होते. यशवंतरावांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा प्रश्न उपस्थित केला. मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी आपल्या बंगल्यांची इंग्रजी नावे बदलावीत व महाराष्ट्राच्या संस्कृतीशी निगडीत अशी नावे द्यावीत असे सुचविले आणि आपण आपल्या बंगल्याला ' सह्याद्री ' हे नवीन नाव देत आहोत असे जाहीर केले. महाराष्ट्राच्या भावविश्वात ' सह्याद्री ' या शब्दाला वेगळे महत्त्व आहे. ' सह्याद्री ' हा मराठी माणसाच्या स्वभावाचे प्रतिक आहे. म्हणून यशवंतरावांनी आपल्या बंगल्यासाठी हे नाव निवडले. त्यानंतर मग ' देवगिरी ' , ' रामटेक ', ' रायगड ' अशी मराठवाडा, विदर्भ व कोकणातील सांस्कृतिक जीवनाशी निगडित नावे पुढे आली. या नावातूनही महाराष्ट्राची अस्मिता जोपासली गेली. असे निर्णय छोटे असले तरी त्यांचे सांस्कृतिक परिणाम दूरगामी असतात आणि अशा छोट्या छोट्या निर्णयातूनच राज्याची अस्मिता जोपासली जात असते याचे पूर्ण भान यशवंतरावांना होते.