लोकांना नाराज कशासाठी करायचे ?
मुख्यमंत्री असताना यशवंतराव आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी सातारा जिल्ह्याला भेट द्यायचे. विभागीय आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिका-याला सोबत घेऊन ग्रामीण भागाचा दौरा करायचे. त्यावेळी एस. राजगोपाल हे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांना जिल्ह्याची उत्तम माहिती होती व त्यांचे ड्रायव्हिंगही चांगले होते. त्यांना सोबत घेऊनच साहेब दौ-यावर जात असत. दिवसभरात ५-६ खेड्यांचा दौरा असे. यशवंतराव स्वत: लोकांशी बोलत, कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारीत. अधिका-यांना तात्काळ कामासंबंधी सूचना देत. यशवंतराव सहजपणे लोकांत मिसळत. लोकांच्या भाषेतच त्यांच्याशी बोलत. रात्री दहानंतर वेगवेगळ्या खात्यांच्या अधिका-यांची बैठक घेत. कामाबाबत आढावा घेत. अधिका-यांनी सांगितलेली माहिती आणि गावक-यांनी सांगितलेली वस्तुस्थिती तपासून बघत. त्यामुळे अधिकारी तयारी करूनच बैठकीस येत असत. ज्या गावात यशवंतरावांचा दौरा असे, त्या प्रत्येक ठिकाणी लोक मांसाहारी जेवणाचा बेत करीत असत. यशवंतराव प्रत्येक ठिकाणी जेवण करीत. एकदा राजगोपाल त्यांना म्हणाले, ' साहेब , प्रत्येक ठिकाणी जेवू नका, प्रकृतीच्या दृष्टीने हे योग्य नाही. '
यशवंतराव म्हणाले, ' ग्रामीण भागातील गोरगरीब जनता मोठ्या प्रेमाने आपल्याला जेवायला बोलावते. आपण जेवलो तर त्यांना बरे वाटते, नाही जेवलो तर त्यांना तो अपमान वाटतो. मग लोकांना नाराज का करायचे ?'
यावरून त्यांची प्रत्येक कृती ही लोकाभिमुख होती हे वरील प्रसंगातून लक्षात येते.