कोणाला टोपी घातली नाही !
महाराष्ट्राच्या जनतेने ज्यांची भाषणे आवडीने ऐकली, अशा वक्त्यांमध्ये यशवंतरावांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागते. हजरजबाबीपणा हा त्यांच्या वक्तृत्वाचा महत्त्वाचा विशेष होता. शिवाय सभेच्या सुरुवातीसच वातावरणनिर्मिती झाली तर पुढील भाषणातून श्रोत्यांना बांधून ठेवता येते ही वक्त्याच्या दृष्टीने उपयुक्त असणारी बाब ते चांगलीच जाणून होते.
यशवंतराव मुख्यमंत्री असताना १९६१ साली इस्लामपूर ( जि. सांगली ) येथील काँग्रेस कमिटीच्या वतीने राजारामबापू पाटील यांच्या सत्काराची मोठी सभा भरली होती. त्या सभेमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यावेळी सांगलीचे श्री. कडलास्कर कुठूनतरी एक गांधी टोपी घेऊन आले व म्हणाले, ' मी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहे. साहेबांनी मला टोपी घालावी.' त्यावेळी यशवंतराव म्हणाले, ' मी आजवर कधीच कुणाला टोपी घातली नाही.'
या त्यांच्या वाक्यावर सगळी सभा हास्यात बुडून गेली.