सह्याद्री सर्वांचा आहे !
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झली. या नव्या राज्यासाठीची प्रतिके ठरविण्यात आली. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी लिहिलेले ' बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा ! ' हे गीत साहेबांनी महाराष्ट्रगीत म्हणून स्वीकारले. त्यावेळी काही लोकांचा या गीताला ' महाराष्ट्रगीत ' म्हणून मान्यता देण्यास विरोध होता. या गीतासंबंधी चर्चा करण्यासाठी साहेबांनी एकदा खानदेशातील थोर कवी सोपानदेव चौधरी यांना बोलावून घेतले. सोपानदेव सचिवालयात गेले तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर बरीच गर्दी जमली होती, पण साहेबांनी सोपानदेवांना लगेच आत बोलावून घेतले व बराच वेळ त्यांच्याशी चर्चा केली. सोपानदेवांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर साहेब म्हणाले, ' विदर्भाप्रमाणे मराठवाड्यातील काही लोकसुद्धा या गीताबद्दल एक अढी घेऊन बसले आहेत की, या गीतात विदर्भ आणि मराठवाडा यांचा उल्लेख नाही. वास्तविक हे गीत लिहिणारे कोल्हटकर विदर्भातीलच आहेत. त्यांना हे जाणवले नसते का ? या गीतात महाराष्ट्राची शक्ती आणि आकांक्षा सामावल्या आहेत. ' मर्यादा पौरूषासि जेथे दु:सहा, आकांक्षापुढति जिथे गगन ठेंगणे ' ही शक्ती आहे. यात भूगोलाला स्थान नाही, तर इतिहासाला आहे. त्यातील तेजाला , शौर्याला आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा, म्हणजे सर्वांचा आहे. सह्याद्रीचा उल्लेख अस्पृश्य होऊन कसा चालेल ? कारण याच सह्याद्रीच्या द-याखो-यातून क्रांती स्फुरलेली आहे. '
सह्याद्रीविषयी साहेबांना किती आत्मियता होती हे जसे वरील प्रसंगातून दिसून येते, तसेच जनतेच्या किंचित् नाराजीची देखील साहेब किती गंभीर दखल घेत होते हेही यातून दिसून येते.