मथुरेचा बाजार
यशवंतरावांनी त्यांच्या आयुष्यात अक्षरश: हजारो भाषणे दिली. कधी विद्वानांच्या सभेत तर कधी अशिक्षित शेतक-यांच्या मेळाव्यात. कधी विधीमंडळात तर कधी प्रचारसभेत अशा अनेक प्रसंगी त्यांना भाषण करावे लागे. प्रसंग कोणताही असला तरी यशवंतरावांचे भाषण मात्र काही नवीन विचार देणारे व समयोचित असे. श्रोतृवर्ग बदलला म्हणून यशवंतरावांचे भाषण पडले असे कधीच घडले नाही. याचे सर्वात महत्वाचे कारण पाहिजे यशवंतरावांना श्रोत्यांचे मानसशास्त्र पूर्णपणे अवगत होते. श्रोत्यांना समजेल अशा भाषेत ते बोलायचे व त्यांना चटकन् समजतील व पटतील अशी उदाहरण ते द्यायचे.
सन १९६० सालच्या ऑक्टोबर महिन्यात महाबळेश्वर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचे शिबीर आयोजित केले होते. देशासमोरील समस्यांची जाणीव कार्यकर्त्यांना व्हावी व त्यावरील उपाययोजनांची चर्चा व्हावी या हेतूने यशवंतरावांच्या पुढाकारानेच हे शिबीर भरले होते. या शिबीरात भाषण करताना यशवंतरावांनी भारतीय शेतीच्या दुरवस्थेविषयी विवेचन केले. आपली शेती मागासलेली आहे हे सांगताना त्यांनी शेतीला मथुरेच्या बाजाराची उपमा दिली. ते म्हणाले , ' आजही महाराष्ट्रात साडेतीन कोटी एकर जमीन अशी आहे जी गळक्या भांड्यासारखी आहे. मथुरेची गवळण नदीला पाणी भरून डोक्यावर माठ घेऊन निघते, पण घरी येऊन पाहते तर माठात पाणीच नसते. तसेच आमच्या शेतीचे झाले आहे. दरवर्षी मृग नक्षत्रापासून हस्त नक्षत्रांपर्यंत भरलेल्या नक्षत्रांच्या बाजारामध्ये बिचारी आमची शेती डोक्यावर माठ घेऊन जाते खरी, पण त्यात शेवटी काहीच शिल्लक राहत नाही. आमच्या महाराष्ट्राच्या शेतीचा असा हा मथुरेचा बाजार झालेला आहे.'
प्रतिभावान साहित्यिकांनाच फक्त सुचू शकते अशी ही उपमा यशवंतरावांना सहज सुचली आणि महाराष्ट्राच्या शेतीचे खरे दुखणे त्यांनी लोकांसमोर मांडले. महाराष्ट्रासमोरच्या मूलभूत प्रश्नांचे त्यांचे आकलन किती सखोल होते हेच यातून दिसून येते.