लोककलेचा गौरव
१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. नवमहाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी यशवंतरावांनी कंबर कसली. त्यावेळी महाराष्ट्रभर उत्साहाचे व आनंदाचे वातावरण होते. कृषी, उद्योग, सहकार आणि कलेच्या क्षेत्रात चैतन्य संचारले होते.
यशवंतराव मुख्यमंत्री असताना १९६० साली जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे भव्य कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात राधाबाई बुधगावकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा लोकनाट्याचा प्रयोग झाला. अस्सल मराठमोळे लोकनाट्य आणि खड्या आवाजातल्या लोकसंगीतातल्या रचना यशवंतरावांना प्रभावित करून गेल्या. या कलावंतांच्या प्रतिभेची यशवंतरावांनी मनोमन नोंद घेतली. त्यानंतर दोन वर्षे निघून गेली. १९६२ साली चीनने भारतावर आक्रमण केले तेव्हा पं. नेहरूंनी यशवंतरावांना दिल्लीला बोलावले. यशवंतराव संरक्षणमंत्री बनले. बर्फाळ प्रदेशात शत्रूशी लढणा-या जवानांचे मनोधैर्य टिकून रहावे यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जाऊ लागले, तेव्हा यशवंतरावांना राधाबाईंच्या लोकनाट्याची आठवण झाली. त्यांनी राधाबाई बुधगावकर व त्यांच्या कुटुंबियांचे घरंदाज मराठमोळं लोकनाट्य जवानांच्या रंजनासाठी आठवणीनं पाठवलं आणि नंतर त्यांचा योग्य तो गौरव केला.