असा प्रकार होणार नाही !
गाजावाजा न करता शांतपणे समाजकार्य करणे हा यशवंतरावांचा स्वभाव होता आणि अशाप्रकारे सेवा करणारे लोक त्यांना आवडत असत. मात्र कणभर समाजसेवा करून मणभर प्रसिद्धी मिळविणा-या लोकांचा त्यांना तिटकारा वाटत असे. शेठ चांदमल कठारिया हे यशवंतरावांचे जुने मित्र होते. दोघांचा एकमेकांवर खूप विश्वास होता, पण व्यक्तिगत संबंध कितीही जवळचे असले तरी सार्वजनिक हिताचे भान यशवंतरावांना नेहमीच असे. त्याबाबतीत ते कसलीही तडजोड करीत नसत.
एकदा सेवासदन संस्थेच्या समारंभासाठी पं. नेहरूंना आणावे म्हणून शेठ चांदमल, श्रीमंत मालोजीराजे निंबाळकर यांच्याबरोबर यशवंतरावांकडे गेले. यशवंतराव म्हणाले, ' पंडितजींचा होकार मिळविण्यासाठी मी व्यक्तीश: प्रयत्न करेन.' शेठ चांदमल म्हणाले, ' मी या संस्थेला थाळीभर रुपये देऊ इच्छितो. ही देणगी पंडितजींच्या हस्ते त्या समारंभातच देण्यात यावी, असे मला वाटते.'
यशवंतरावांना शेठ चांदमल यांचा प्रसिद्धीचा हव्यास आवडला नाही. ते ताडकन् म्हणाले, ' शेठजी , लाखो रुपयांच्या देणग्या देणारे देखील असे म्हणत नाहीत. तुमची ही अपेक्षा बरोबर नाही. असा प्रकार होणार नाही.'