त्यांची जाण ठेवायला नको ?
निष्ठावान कार्यकर्त्यांची यशवंतरावांनी नेहमीच कदर केली. त्यांच्या गुणांचा व कौशल्यांचा संघटनेला व समाजाला उपयोग व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना व पुढे दिल्लीत गेल्यावरसुद्धा , प्रदेश काँग्रेसवर यशवंतरावांची घट्ट पकड होती. उमेदवारांना तिकिटवाटप करताना त्यांच्या शब्दाला मान होता.
एकदा विधानसभेच्या निवडणुकीसाठी यशवंतरावांनी मामासाहेब मोहोळ, नामदेवराव मते व नामदेवराव जगताप यांना पक्षातर्फे उमेदवारी दिली. तिघेही स्वातंत्र्यसैनिक होते. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी हालअपेष्टा सोसल्या होत्या. जनतेला याची जाण होती आणि म्हणूनच हे तीघेही प्रचंड मतांनी विजयी झाले, विधानसभेत गेले. पण यशवंतरावांनी या अशिक्षित ( ? ) व कायद्याचे ज्ञान नसलेल्या उमेदवारांना तिकिटे दिल्याचे अनेकांना आवडले नाही. त्यांनी नाके मुरडली. एका शहरी, विद्वान नेत्याने तर थेट यशवंतरावांनाच प्रश्न विचारला ! यशवंतराव , जगताप, मते आणि मोहोळ यांचा तुम्हाला असेंब्लीत काय उपयोग होणार आहे ? त्यांचे शिक्षण व संसदीय कामाचा आवाकाही बेताचाच आहे.'
यशवंतराव म्हणाले, ' काँग्रेसच्या दोनशे आमदारांत असे पाच - दहा नामदेव मला सहज चालतील. ज्या कार्यकर्त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात तुरुंगवास भोगला, संघटनेसाठी खस्ता खाल्ल्या, लोकांच्या अडीअडचणींना जे धावले, ज्यांच्याबरोबर लोक आहेत त्यांची जाण ठेवायला हवी की नको ? शिक्षणानेच माणूस शहाणा होतो असे नाही.'
यशवंतरावांचे शिक्षणाविषयीचे वरील निरीक्षण किती अचूक होते !
खरंच शिक्षणाने माणूस शहाणा होतोच असे नाही !