कथारुप यशवंतराव- आमच्यासोबत चहा घ्या !

आमच्यासोबत चहा घ्या !

प्रा. सुरेश जाधव हे परभणीमधील एका कॉलेजमध्ये अध्यापनाचे काम करीत होते. १९८१ साली त्यांचा ' माती ' हा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्या कथासंग्रहाची एक प्रत त्यांनी यशवंतरावांना दिल्लील्या पत्त्यावर भेट म्हणून पाठविली . उत्तराची अपेक्षा अर्थातच नव्हती. पण ध्यानीमनी नसताना एकेदिवशी त्यांना एक लिफाफा मिळाला. ते यशवंतरावांनी दिल्लीहून पाठविलेलं पत्र होतं. अत्यंत समर्पक शब्दात त्यांनी पुस्तकाविषयीचा आपला अभिप्राय त्यांना कळविवा होता व पुस्तक भेट दिल्याबद्दल लेखकाचे आभार मानले होते.

त्यानंतर काही दिवसांनी प्रा. जाधव ज्या संस्थेत काम करीत होते, त्या संस्थेने नवीन विधी महाविद्यालय सुरू करायचे ठरविले. या नूतन कॉलेजच्या उदघाटन समारंभासाठी यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील आले होते. कार्यक्रम संपल्यावर पाहुणे चहापानासाठी प्राचार्यांच्या केबिनमध्ये गेले. यशवंतरावांचे दर्शन घ्यावे या हेतूने प्रा. जाधवही तिथे गेले. त्यांनी टेबलावर पुस्तके ठेवली. साहेबांना नमस्कार केला. आपली ओळख करून दिली, तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता यशवंतराव म्हणाले, ' अहो, मी परवाच तुम्हाला पत्र पाठवलं. मिळालं नाही का ?'

' मिळालं साहेब, आभारी आहे ' असे म्हणून प्रा. जाधव जायला निघाले तेव्हा यशवंतराव म्हणाले, ' तुम्हीही थांबा. तुम्ही लेखक आहात. आमच्या सोबतच चहा घ्या. बसा.' एका थोर नेत्याने आपल्या छोट्याशा लेखनकृतीला दिलेली ही दाद पाहून सुरेश जाधव भारावले. हीच तर यशवंतरावांची खासियत होती. साध्या साध्या प्रसंगातून यशवंतरावांनी माणसे उभी केली. त्यांच्या पंखांना बळ दिले.