तुम्ही मला दवाखान्यात नेताय ?
यशवंतराव आणि वेणूताई यांच्या संसारात तीन दिवसांचे विशेष महत्त्व होते. लग्नानंतरच्या पहिल्या संक्रांतीला वेणूताई तुरूंगात होत्या. म्हणून त्यानंतरच्या प्रत्येक संक्रांतीला यशवंतराव घरीच थांबत असत. १२ मार्च हा यशवंतरावांचा वाढदिवस आणि २ जून हा त्यांच्या लग्नाचा वाढदिवस. हे दिवसही दोघांसाठी ' खास ' होते. एकमेकांच्या सहवासात ते आनंदाने हे दोन दिवस साजरे करीत. खरं तर वेणूताईंना यशवंतरावांचा सहवास फार कमी लाभला. राजकारणाच्या व्यापामुळे आपण पत्नीला पुरेसा वेळ देऊ शकत नाही, याची यशवंतरावांना कायमच खंत वाटत राहिली.
१९८० नंतर यशवंतरावांच्या वाट्याला राजकीय विजनवास आला. जगाची संगत सुटली तरी आपल्या प्रिय पत्नीची सोबत आपल्याला आहे याचा आनंद त्यांना होता. पण दुर्दैवाने नेमक्या याच काळात वेणूताईंची प्रकृती खालावत चालली. त्यांच्यावर घरीच उपचार चालू होते. १ जून १९८३ रोजी सकाळी डॉक्टरांनी त्यांना तपासले व त्यांना दवाखान्यात हलवावे लागेल, अन्यथा त्यांच्या जीवाला धोका आहे असे यशवंतरावांना बाजूला घेऊन सांगितले. यशवंतरावांनी ताबडतोब वेणूताईंना दवाखान्यात दाखल करायचा निर्णय घेतला. पण आपल्याला सोडून वेणूताई दवाखान्यात जायला तयार होणार नाहीत हे माहित असल्यामुळे, त्यांनी वेणूताईंना काहीही सांगितले नाही.
दुस-या दिवशी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. वेणूताई अंथरूणावरूनच तयारीच्या सूचना देत होत्या. आपल्याला दवाखान्यात नेण्याची तयारी चालू आहे याचा, कसे कोण जाणे पण त्यांना अंदाज आला. त्यांनी यशवंतरावांना जवळ बोलावले. त्यांचा हात हातात घेऊन त्या म्हणाल्या, ' खरं सांगा, तुम्ही मला दवाखान्यात भरती करणार आहात का ?' यशवंतरावांनी आवंढा गिळत ' हो ' म्हणून स्पष्टीकरण देण्यास सुरुवात केली, पण त्यांना मध्येच थांबवून त्या म्हणाल्या, ' मला तुमच्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचं आहे .' यशवंतराव आपल्या मांडीवर त्यांचे डोके ठेवून त्यांना हळूवार थोपटू लागले आणि काही सेकंदातच वेणूताईंनी प्राण सोडला.
आपल्या प्राणप्रिय पतीला सोडून दवाखान्यात राहण्यापेक्षा त्याच्या मांडीवर शेवटचा श्वास घेतलेला बरा, असा तर विचार त्यांनी केला नसेल ? वेणूताईंच्या पतीनिष्ठेचे तेजोवलय यशवंतरावांचे अंत:करण भेदून गेले आणि त्यांनी आर्त टाहो फोडला. सायंकाळच्या विमानाने वेणूताईंचा निष्प्राण देह मुंबईत आणला गेला. लग्नाच्या वाढदिवसाची तयारी करणा-या वेणूताई हिरवी वस्त्रे व हिरवा चुडा लेवून अंतिम प्रवासाला निघाल्या. आईच्या मृत्युनंतर वाट्याला आलेले पोरकेपण पुन्हा एकदा यशवंतरावांच्या वाट्याला आले !