मी तुम्हाला वा-यावर सोडणार नाही
सन १९६२ साली यशवंतराव दिल्लीला गेले. अनेक वर्षे सातत्याने दिल्लीत वास्तव्य घडल्यामुळे त्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभाव हळूहळू कमी होत गेला. विशेषत: १९७५ साली त्यांच्या विचारांना मानणा-या वसंतराव नाईक यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर ख-या अर्थाने त्यांचे राजकीय सामर्थ्य कमी झाले. दिल्लीने हात सोडला व महाराष्ट्राने साथ सोडली. एकेकाळी त्यांचा प्रत्येक शब्द झेलणारे लोक आता त्यांच्याकडे साफ दुर्लक्ष करू लागले.
या अखेरच्या काळात ( १९८३ साली ) एकदा यशवंतराव आणि वसंतदादा पाटील पुण्यातील शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूलमध्ये एका कार्यक्रमासाठी येणार होते. वसंतदादा तेव्हा मुख्यमंत्री होते आणि यशवंतराव आठव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. त्यावेळी पुण्यातल्या मुंढवा येथील जमिनीचा प्रश्न चिघळला होता. ब्रिटीशांनी गुन्हेगार जमातींना दिलेला शेकडो एकर जमिनी त्या जमाती वहिवाटप होत्या. महापालिकेने या जमिनी ताब्यात घेऊन त्या गोठ्यांना दिल्या होत्या. या जमिनी परत मिळाव्यात म्हणून उपेक्षितांसाठी लढणारे सामाजिक कार्यकर्ते व प्रसिद्ध लेखक लक्ष्मण माने यांनी शिवाजी मराठा प्रिपरेटरी स्कूलवर हजारो लोकांचा मोर्चा काढला. यशवंतराव आणि वसंतदादा आत कार्यक्रमात होते. बाहेर पोलीस आणि आंदोलकांची धुमश्चक्री चालू होती. पोलीसांचा लाठीमार चालू होता. यशवंतरावांना बाहेर काय चाललंय हे समजले. त्यांनी दहा - बारा लोकांचे शिष्टमंडळ घेऊन लक्ष्मण मानेंना आत बोलावले. त्याप्रमाणे दहा - बारा लोकांना घेऊन माने आत आले. पण मुख्यमंत्री इतर लोकांशी बोलत होते. यशवंतराव शिष्टमंडळाचे म्हणणे मुख्यमंत्र्यांना सांगत होते, पण मुख्यमंत्र्यांचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. हा यशवंतरावांचा अपमान होता. घोर अपमान होता. आपल्या लाडक्या नेत्याची अप्रतिष्ठा झालेली पाहून लक्ष्मण माने संतापले व त्यांनी तिथेच सरकारविरोधी घोषणा द्यायला सुरूवात केली. मुख्यमंत्र्यांना ते म्हणाले, ' आमच्याकडे बघायला व आमच्याशी बोलायला तुम्हाला वेळ नसेल तर नसू द्या, पण तुमच्याशेजारी बसलेल्या या थोर नेत्याकडे तरी लक्ष द्या.' कार्यकर्तेही चिडले. त्यांनी ' यशवंतराव झिंदाबाद ' अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यशवंतराव तात्काळ उठले. त्यांनी घोषणा बंद करायला लावल्या.
वसंतदादा जिल्हाधिका-याला म्हणाले, ' ते जे काय आहे ते आत्ताच्या आत्ता मिटवा.' कलेक्टरनी आपली बाजू मांडली. मुख्यमंत्री आपल्या गाडीत बसून निघून गेले. यशवंतराव बाहेर जमलेल्या उपेक्षितांच्या गर्दीला सामोरे गेले. गर्दी एकदम स्तब्ध झाली. यशवंतराव म्हणाले, ' या सर्व जमिनी तुम्हाला दिल्या आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. या जमिनी कुणीही काढून घेऊ शकत नाही. मी रेकॉर्ड पाहिले आहे. आपण जमिनीचा ताबा सोडू नका. मी योग्य ठिकाणी बोलतो. हा प्रश्न नक्की सुटेल. याच्यासाठी जे जे करायला लागेल ते ते मी करतो. पुढच्या महिन्यात मी पुन्हा येईन. प्रशासनाबरोबर बोलेन. पण तुम्हाला वा-यावर सोडून देणार नाही.'
लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यांना हुरूप आला व मनात आशा जागवत ते आपापल्या घरी गेले .... आणि मनाला झालेली जखम वागवत यशवंतराव आपल्या गाडीत शिरले.