कथारुप यशवंतराव- अशी प्रस्तावना लिहू शकणार नाही !

अशी प्रस्तावना लिहू शकणार नाही !
 
श्री. बा. ह. कल्याणकर हे एक लेखक व कार्यकर्ते होते. यशवंतरावांचा आणि त्यांचा जुना स्नेह होता. आपले नवीन पुस्तक प्रकाशित झाल्यावर त्या पुस्तकाची एक प्रत ते आवर्जून दिल्लीला यशवंतरावांना पाठवत असत. यशवंतराव देखील ते पुस्तक वाचून त्याविषयीचा आपला मार्मिक अभिप्राय त्यांना कळवत.

१९८३ साली कल्याणकरांचा ' दिशा आणि दृष्टी ' हा वैचारिक लेखसंग्रह प्रकाशित होणार होता. या पुस्तकाला यशवंतरावांची प्रस्तावना असावी असे कल्याणकरांना वाटले. त्यांनी यशवंतरावांना भेटून तशी विनंती केली. यशवंतराव म्हणाले, ' पुस्तकाची मुद्रणप्रत पाठवा. प्रस्तावना देतो.' त्याप्रमाणे कल्याणकरांनी एक मुद्रणप्रत यशवंतरावांना दिल्लीच्या पत्त्यावर पाठवली. प्रत हाती मिळताच त्यांनी ती वाचून काढली. कल्याणकरांनी छ. शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिलेले लेख त्यांना आवडले. पण चालू राजकीय स्थितीवरील त्यांचे भाष्य मात्र त्यांना आवडले नाही. त्यांनी कल्याणकरांना पत्र लिहून सांगितले की, या पुस्तकासाठी मी प्रस्तावना लिहू शकणार नाही. मात्र नकार कळविताना त्यांनी जी भाषा वापरली त्यामुळे लेखकाचा हिरमोड न होता उलट त्याला आधारच मिळाला. साहेबांनी लिहिले होते,

' तुमचे पत्र आणि ' दिशा आणि दृष्टी ' या पुस्तकाची मुद्रणप्रत मिळाली. मी हाती येताच वाचून काढली. शिवाजी महाराज व महात्मा फुले यांच्याबद्दलचे तुमचे लेख उत्तम आहेत. परंतु चालू राजकीय स्थिती आणि त्यावरील तुमची निदाने वाचल्यानंतर माझ्या हे लक्षात आले की तुमच्या पुस्तकाला मी प्रस्तावना लिहिणे योग्य नाही, कारण प्रस्तावना लिहायची म्हणजे मला तुमच्या विचारांवर सपाटून टीका करावी लागेल आणि अशी प्रस्तावना लिहिण्याची माझी इच्छा नाही. कारण मला तुमच्याबद्दल लोभ आहे व तुमच्या साहित्यगुणांबद्दल कौतुक आहे. स्पष्ट लिहिल्याबद्दल राग मानू नका. असेच प्रेम असू द्यावे .'

आपला
यशवंतराव चव्हाण