कथारुप यशवंतराव- अशा घरात मी राहणार नाही !

अशा घरात मी राहणार नाही  !

यशवंतरावांनी महाराष्ट्रातल्या व महाराष्ट्राबाहेरच्या असंख्य लोकांवर प्रेम केले, पण माथाडी कामगारांचे नेते आण्णासाहेब पाटील यांच्यावर त्यांनी जे प्रेम केले त्याची तुलना कशाशीही करता येणार नाही. माथाडी कामगारांची संघटना उभी रहावी, कामगारांवरील अन्याय दूर व्हावेत अशी त्यांची इच्छा होती. या भूमिकेतून त्यांनी सतत माथाडींची पाठराखण केली. वेळप्रसंगी सरकारची ताकद कामगारांच्या मागे उभी केली.

पुढे एक काळ असा आला की, यशवंतरावांना मुंबईत रहायला घर नव्हते. मुंबईत आल्यावर ते ' सह्याद्री ' अतिथीगृहात उतरत असत. माथाडींचे नेते आण्णासाहेब पाटील यांना हे पहावले नाही. महाराष्ट्राच्या शिल्पकाराला महाराष्ट्राच्याच राजधानीत राहण्यासाठी स्वत:चे साधे घर नसावे, याचे आण्णासाहेबांना दु:ख झाले. यशवंतरावांना मुंबईत घर घेऊन द्यायचे असा त्यांनी निर्धार केला. संघटनेच्या प्रत्येक सभासदाकडून वर्गणी गोळा केली गेली. काही लाख रुपये जमा झाल्यावर स्वत: आण्णासाहेब दिल्लीला गेले. यशवंतरावांना आपल्या मनातला हेतू सांगितला. साहेब रागावले व म्हणाले, ' आण्णासाहेब , कामगारांच्या घामाच्या पैशातून बांधलेल्या अशा घरात मी कधीच राहणार नाही. माझ्यावर तुमचे खरेच प्रेम असेल तर माझ्यासाठी एक करा, ही जमविलेली रक्कम लवकरात लवकर प्रत्येक कामगाराला परत करा. ' आण्णासाहेब खूप निराश झाले. पण त्यांनी आशा सोडली नाही. त्यांनी मा. शरद पवार यांच्यामार्फत यशवंतरावांना पुन्हा एकदा विनंती करण्याचा प्रयत्न केला, पण यशवंतरावांनी नकार दिला तो कायमचाच. शेवटी अगदी नाईलाज होऊन आण्णासाहेबांनी कामगारांकडून जमविलेली ती रक्कम प्रत्येक कामगाराला युनियनच्या ऑफिसमध्ये बोलावून परत केली.

यशवंतराव जवळजवळ चाळीस वर्षे सत्तेत होते, पण मुंबईमध्ये त्यांनी स्वत:च्या मालकीचे साधे दोन खोल्यांचे घरसुद्धा बांधले नाही. धन्य ते यशवंतराव , ज्यांनी कष्टक-यांच्या घामातून बांधलेल्या घरात रहायला नकार दिला, आणि धन्य ते आण्णासाहेब ज्यांनी गोळा केलेली लाखो रुपयांची वर्गणी कामगारांना साश्रू नयनांनी परत केली  !