भस्मासूर उलटला  !
थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अॅड. रावसाहेब शिंदे यांनी सांगितलेली ही आठवण. सन १९६६ मध्ये रावसाहेबांनी सहकारी साखर कारखानदारीतील अनिष्ट प्रवृत्तींविरुद्ध व बेशिस्त आर्थिक धोरणांविरुद्ध आपल्या सहका-यांसह लढा उभारला होता. कारखानदारांच्या भ्रष्ट आर्थिक व्यवहाराला पायबंद घालण्यासाठीच हा लढा होता. सुमारे तीन वर्षे हा लढा त्यांनी सातत्याने चालवला आणि त्यात त्यांना ब-यापैकी यशही मिळत चालले होते.
एकदा , १९६९ साली यशवंतरावांचा नगर जिल्ह्यात दौरा होता. पारनेर येथे सेनापती बापट यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी यशवंतराव येणार होते. त्यांच्याबरोबर किसन वीर, मुख्यमंत्री वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील व इतर अनेक मान्यवर मंडळी होती. किसन वीरांना रावसाहेबांच्या कार्याविषयी सहानुभूती होती. त्यांनीच रावसाहेबांना आपल्या आंदोलनाविषयी यशवंतरावांना माहिती देण्यासाठी शिष्टमंडळ घेऊन येण्यास सुचविले. त्याप्रमाणे समारंभ संपल्यानंतर रावसाहेब शिंदे, गोविंदराव आदिक व इतर कार्यकर्ते सुप्याच्या सरकारी बंगल्यावर गेले. त्यांनी आपली भूमिका यशवंतरावांसमोर मांडली. यावेळी बोलताना रावसाहेब शिंदे यशवंतरावांना उद्देशून काहीशा आक्रमकपणे म्हणाले,' सहकारक्षेत्रात तुम्ही भ्रष्ट वृत्तीचे भस्मासूर पोसत आहात. एक दिवस हे भस्मासूर तुमच्या आणि इंदिरा गांधींच्याही डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाहीत.' हे निर्भीड व परखड बोल कोणालाही फारसे रुचले नाहीत. यशवंतरावांनी त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले, आणि तो विषय तिथेच संपला.
त्यानंतर बराच काळ उलटला. सहकार क्षेत्रातील भ्रष्ट प्रवृत्ती वाढतच गेल्या. यशवंतरावांची पदे बदलत गेली व अखेरीस त्यांच्याही वाट्याला एकटेपणा आला. या त्यांच्या अखेरच्या दिवसात एकदा आण्णासाहेब शिंदे ( रावसाहेबांचे थोरले बंधू ) यशवंतरावांना भेटायला त्यांच्या दिल्लीतील घरी गेले. जिव्हाळ्याच्या गप्पा झाल्या आणि एकदमच यशवंतराव म्हणाले, ' अण्णासाहेब, अनेक वर्षांपूर्वी तुमचे धाकटे बंधू सुप्याच्या बंगल्यावर सहकारी कारखानदारीविषयी माझ्यापुढे बोलले होते. त्यांचे बोलणे त्यावेळी मला रुचले नव्हते,  पण काळाने त्यांचे बोलणे सत्य ठरवले आहे.'
यशवंतराव दुराग्रही कधीच नव्हते. आपली मते दुरुस्त करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही.

 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
																									
						
					 
			 
									 
			