कथारुप यशवंतराव- तुम्हाला वेळ आहे का ?

तुम्हाला वेळ आहे का ?

डॉ. कन्हैय्या कुंदप हे कराडच्या सदगुरु गाडगे महाराज कॉलेजमध्ये मराठीचे प्राध्यापक होते. महानुभाव संप्रदायाच्या वाङ्मयासंबंधी त्यांनी सखोल संशोधन केले होते. ३० ऑगस्ट १९८० रोजी नेहमीप्रमाणे ते कॉलेजमध्ये गेले होते. चहापानासाठीची पंधरा मिनिटांची विश्रांती संपल्यावर ते एम. ए. च्या वर्गावर अध्यापनासाठी जाणार इतक्यात त्यांच्यासाठी एक फोन आला. डॉ. कुंदप यांनी फोन घेतला. पलिकडून आवाज आला, ' डॉ. कुंदप, तुम्हाला आज संध्याकाळी वेळ आहे का ?'

' माफ करा, पण आपण कोण बोलत आहात हे मला समजले नाही, ' कुंदप सर म्हणाले. ' मी यशवंतराव चव्हाण बोलतोय.' पलीकडून आवाज आला. साक्षात् यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला फोन केलाय, या जाणिवेने सरांना एवढा धक्का बसला की त्यांना काही बोलताच येईना. महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात व्यस्त असणारे यशवंतराव आपल्याला कशाला फोन करतील ? त्यांचा स्वत:च्या कानांवर विश्वासच बसेना. कसेबसे सावरून ते म्हणाले ,' होय साहेब, दुपारी चारनंतर मी मोकळाच आहे .'

यशवंतराव म्हणाले, ' मग संध्याकाळी भेटायला या. तुमच्याशी चर्चा करायची आहे.'

ठरल्याप्रमाणे कुंदप सर संध्याकाळी यशवंतरावांकडे गेले. महानुभाव वाङ्मयाबद्दल साहेबांना आपल्याशी चर्चा करायची असेल असा अंदाज करून त्यांनी स्वत:चे शोधनिबंध व इतर पुस्तके सोबत नेली. ते यशवंतरावांच्या जीवनातील अखेरचे पर्व होते. राजकीय आयुष्यात त्यांच्या वाट्याला विजनवास आला होता. कराडला आल्यावर ' विरंगुळा ' या आपल्या निवासस्थानी ते साहित्य, कला, क्रीडा, इत्यादी क्षेत्रातील होतकरू लोकांना बोलावून घ्यायचे. त्यांची आपुलकीने चौकशी करून प्रोत्साहन द्यायचे. त्यांच्यासाठी हा एक ' विरंगुळाच ' होता. यशवंतरावांनी कुंदप सरांना महानुभाव वाङ्मयाविषयी माहिती विचारली. त्यांच्याकडून महानुभवांच्या लिपीचे वाचनही करवून घेतले. डॉ. कुंदप म्हणाले, ' मला महानुभवांच्या २६ लिप्या वाचता येतात. यशवंतरावांना आनंद झाला. ते म्हणाले, तुम्ही तंजावरच्या सरस्वती महालाला भेट द्यायला हवी. तुमची सगळी व्यवस्था मी करतो. पण तिथे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत, त्यांचे वाचन करून छ. शिवाजी महाराज व मध्ययुगीन महाराष्ट्राच्या लोकजीवनाविषयी काही मौलिक संशोधन व्हायला हवे आहे. सुदैवाने तुम्हाला त्या लिप्या वाचता येतात. त्याचा फायदा सर्वांना व्हायला पाहिजे.'

अशाप्रकारे यशवंतरावांनी कुंदप सरांशी सुमारे तासभर चर्चा केली आणि उठताना त्यांच्या पाठीवर थाप टाकून म्हणाले, ' तुमच्यासारखा साक्षेपी संशोधन माझ्या रयत शिक्षण संस्थेत व त्यातही माझ्या गावात आहे याचा मला अभिमान आहे.'

एका थोर नेत्याने मनापासून केलेले हे कौतुक कुंदप सरांना आयुष्यभर पुरले.