कथारुप यशवंतराव- आबा चेअरमन झाले पाहिजेत !

आबा चेअरमन झाले पाहिजेत !

शेतक-यांच्या उद्धारासाठी सहकारी संस्था आवश्यक आहेत हे ओळखून यशवंतरावांनी राज्यात सहकार चळवळीला उत्तेजन दिले. अनेक सहकारी कारखाने व सहकारी बँका स्थापन झाल्या.
सातारा जिल्हा सहकारी बँकेची स्थापना १९५० साली झाली. यशवंतरावांच्या मार्गदर्शनाखाली या बँकेने जिल्ह्यातील शेतक-यांच्या विकासाचे नवे पर्व सुरू केले. यशवंतरावांचे विश्वासू मित्र व ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किसन वीर अनेक वर्षे बँकेचे संचालक म्हणून काम पहात होते. यशवंतरावांचे जावई दत्ताजीराव सूर्यवंशी हे देखील सलग पंधरा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. त्यांची लक्ष्मी सेंट्रल कोऑपरेटीव्ह बँक त्यांनी जिल्हा बँकेत विलिन केली. त्यामुळे बँकेचे भागभांडवल वाढले. बँकेची स्वत:च्या मालकीची भव्य इमारत उभी राहिली. दत्ताजीरावांचे बँकेसाठीचे योगदान लक्षात घेता यशवंतराव त्यांना बँकेचे चेअरमनपद देतील असे सर्वांना वाटत होते. दत्ताजीरावांचीही चेअरमन होण्याची इच्छा होती. विशेष म्हणजे त्यावेळच्या १५ पैकी ९ सदस्यांचा त्यांना पाठिंबाही होता. फक्त यशवंतरावांच्या संमतीचा अवकाश होता. पण साहेबांच्या मनात काही वेगळेच होते. यावेळी किसन वीर यांनी बँकेचे चेअरमन व्हावे अशी साहेबांची इच्छा होती. दत्ताजीरावांचे प्रयत्न चालू आहेत हे त्यांना समजले. साहेब अस्वस्थ झाले. एका बाजूला जावई तर दुस-या बाजूला जिवलग मित्र. त्यांनी निर्णय घेतला. दत्ताजीरावांना पुण्याला बोलावून घेतले व म्हणाले, ' जावईबापू यावेळी किसनवीर आबा बँकेचे चेअरमन झाले पाहिजेत. तुमचे मत त्यांना द्या. ' प्रश्न मिटला. खुद्द दत्ताजीरावच जर आबांना मत देणार असतील तर निवडणुकीचा प्रश्न येतोच कुठे ? दत्ताजी रावांनीही साहेबांचा आदेश प्रमाण मानून आबांना पाठिंबा दिला. आबा चेअरमन झाले. व्हाईस चेअरमनपदी दत्ताजीरावांची निवड झाली. यशवंतरावांना समाधान वाटले.