कथारुप यशवंतराव- तू राज्याचा मंत्री आहेस !

 तू राज्याचा मंत्री आहेस !

 ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी सांगितलेली ही आठवण. मा. वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळात उद्योग व ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री म्हणून कल्लाप्पाण्णांचा समावेश झाला. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर यशवंतरावांचे आशीर्वाद घेण्यासाठी कल्लाप्पाण्णा दिल्लीला गेले. यशवंतरावांनी त्यांचे अगत्याने स्वागत केले. मंत्री म्हणून काम करीत असताना फायलींचे अवलोकन कसे करावे , नोंदी कशा कराव्यात, टिपणे कशी काढावी वगैरे बारकावे यशवंतरावांनी त्यांना समजावून दिले. सत्तेची खुर्ची ही सेवेची संधी असते, म्हणून समाजातील शेवटचा माणूस डोळ्यासमोर ठेवून सत्ता राबवावी असे सांगितले. इतरही काही विषयांवर चर्चा झाली आणि कल्लाप्पाण्णा जायला उठले. त्यांना निरोप देण्यासाठी यशवंतराव स्वत: उठून दरवाज्यापर्यंत आले. कल्लाप्पाण्णा संकोचून गेले. आपण इतके नवीन आणि अननुभवी असतानाही यशवंतराव आपणाला निरोप द्यायला दरवाजापर्यंत आले या गोष्टीचे त्यांना अप्रुप वाटले. यशवंतरावांनी ते ओळखले. ते हसून म्हणाले, ' किती झाले तरी, तू एका राज्याचा मंत्री आहेस. तुझी प्रतिष्ठा सांभाळणे हे माझे कर्तव्य आहे.'

मनाचा हा मोठेपणा मूळचाच असावा लागतो. त्याचे सोंग फार काळ करता येत नाही. अकृत्रिम आत्मियता हे यशवंतरावांच्या जीवनाचे आधारभूत तत्त्व होते.