मी फक्त नेत्रसुखासाठी आलो आहे !
परराष्ट्रमंत्री असताना युनोच्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी यशवंतराव अमेरिकेला गेले होते. न्युयॉर्क शहरात त्यांचा मुक्काम होता. एकेदिवशी दुपारी न्युयॉर्क शहरात फेरफटका मारण्यासाठी यशवंतराव बाहेर निघाले. सोबत शरद काळे होते. फिरता फिरता एका चित्रप्रदर्शनाजवळ ते आले. एका नामवंत चित्रकाराने काढलेली अनेक अप्रतिम चित्रे तिथे प्रदर्शनासाठी व विक्रीसाठी ठेवली होती. त्यांची किंमतही तशीच होती. दहा हजार डॉलर्सच्या खाली एकाही चित्राची किंमत नव्हती. इच्छा असूनही यशवंतराव ती चित्रे विकत घेऊ शकत नव्हते. कारण त्यांच खिसा रिकामा होता. पण डोळे भरून ते प्रत्येक चित्र पहात होते. त्या प्रदर्शनातले सगळ्यात स्वस्त व यशवंतरावांना आवडलेले चित्र होते एकशेवीस डॉलर्सना. म्हणजे त्यावेळचे एक हजार दोनशे रुपये. पण यशवंतरावांकडे तेवढेदेखील पैसे नव्हते. पुढे गेल्यावर त्यांना जुन्या कोरीव लाकडी वस्तूंचे दुकान दिसले. विविध आकाराच्या त्या सुबक मुर्ती पाहून यशवंतराव फारच प्रभावित झाले. कितीतरी वेळ ते पहातच राहिले. शेवटी दुकानदार म्हणाला,
' काही घेणार का सर ?'
यशवंतराव चटकन भानावर आले व म्हणाले, ' मी फक्त नेत्रसुखासाठी आलो आहे.' दुकानदार सज्जन होता. तो म्हणाला, ' जरूर पहा. आता पैसे नसतील तरी घेऊन जा. भारतात गेल्यावर चेकने पैसे पाठवून द्या. माझा तुमच्यावर विश्वास आहे.'
यशवंतरावांनी दुकानदाराचे आभार मानले व म्हणाले, ' भविष्यात माझ्याजवळ एवढे पैसे आले तर मी जरुर परत येईन.' आवडलेले एक साधे चित्र विकत घेण्याइतकही यशवंतरावांची ऐपत नव्हती. यावर आजची पिढी विश्वास ठेवेल काय ? तीस वर्षे मंत्रीपदावर राहिलेल्या यशवंतरावांची ही ' श्रीमंती ' अविश्वसनीय आहे खरी !