कथारुप यशवंतराव- तत्त्वनिष्ठा

तत्त्वनिष्ठा

सन १९७५ सालचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कराड येथे घ्यायचे ठरले. तो काळ राजकीय अशांततेचा होता. देशात आणीबाणी चालू होती. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी विख्यात विदुषी दुर्गा भागवत व कथाकार वामन चोरघडे हे दोन प्रमुख साहित्यिक निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

दुर्गा भागवतांचा आणीबाणीला कट्टर विरोध होता, आणि यशवंतराव तर केंद्रीय परराष्ट्रमंत्री होते. साहजिकच वामनराव चोरघडे यांची अध्यक्षपदी निवड होणे यशवंतरावांसाठी सोयीचे ठरणार होते, कारण संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वत: यशवंतरावच होते. स्वागत मंडळाच्या सर्व सदस्यांना मतदानाचा अधिकार होता. यशवंतरावांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सुचविले असते तर चोरघडे नक्कीच निवडून आले असते. पण त्यांनी या निवडणूक प्रक्रियेत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या कसलाही हस्तक्षेप केला नाही. निवडणूक झाली आणि दुर्गा भागवत विजयी झाल्या. बहुमताने दिलेला हा कौल यशवंतरावांनी सहजपणे स्वीकारला व तो कार्यवाहीतही आणला. लोकशाहीची प्रतिष्ठा कशी राखायची असते याचा जणू धडाच यशवंतरावांनी घालून दिला.