हे मला आवडले नाही !
सन १९७५ मध्ये लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी निमित्त पुण्यात टिळक स्मारक मंदिरात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींचे व्याख्यान होते. अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. त्यावेळी वसंतराव थोरात पुण्याचे महापौर होते. व्यासपीठावर ते यशवंतरावांच्या शेजारीच बसले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष असूनही यशवंतरावांनी अगोदर भाषण केले. ते म्हणाले, ' आपण सर्वजण तर्कतीर्थांचे भाषण ऐकण्यासाठी जमलेले आहोत. त्यांचा मोठेपणा लक्षात घेऊन मी माझे भाषण अगोदर करतो.'
भाषण करताना यशवंतरावांनी आपले बूट बाजूला काढून ठेवले होते. भाषण संपल्यावर नकळत यशवंतराव त्यांच्या जागेवर येऊन बसले. विचारांच्या तंद्रीत असल्याने पायात बूट घालायचे राहून गेले. बूट माईक शेजारीच राहिले. ही गोष्ट महापौरांच्या लक्षात आली. ते उठले आणि त्यांनी माईकजवळ जाऊन यशवंतरावांचे बूट आणून दिले. साहेबांविषयी वाटणा-या निस्सीम भक्तीभावामुळेच त्यांनी ही कृती केली होती. पण यशवंतरावांना हे आवडले नाही.
कार्यक्रम संपल्यानंतर गाडीत बसल्यावर यशवंतराव महापौरांना म्हणाले, ' वसंतराव, तुझे माझे संबंध काहीही असले तरी तू बूट उचलायला नको होते. असे करता कामा नये.'
महापौर म्हणाले, ' साहेब तुमच्याबद्दल आम्हाला इतका आदर आहे, की तुमचे बूट उचलण्यात मला कमीपणा वाटत नाही. उलट आनंदच वाटतो.'
' तरीही मला हे आवडलेले नाही. तू महापौर आहेस. लोकांच्यासमोर तू असे वागायला नको होते. आपला महापौर मंत्र्याचे बूट उचलतो, हे पुणेकरांना मुळीच आवडणार नाही. सार्वजनिक जीवनात या गोष्टीचं भान राखत जा.'
निष्ठा आणि लाचारी यातला फरक यशवंतरावांनी महापौरांच्या लक्षात आणून दिला आणि तो त्यांच्या चांगलाच लक्षात राहिला.