मी ते चित्र पाहिले !
अनंतराव माने हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे निर्माते - दिग्दर्शक होते. त्यांचे अनेक चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. त्यांनी दिग्दर्शित केलेला ' सांगत्ये ऐका ' हा चित्रपट तर प्रचंड लोकप्रिय झाला. या चित्रपटाचा शतकमहोत्सवी शो पाहण्यासाठी अनंतरावांनी यशवंतरावांना बोलावले. यशवंतरावांचीही खूप इच्छा होती, पण कामाच्या रेट्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. अनंतरावांना वाईट वाटले. यशवंतरावांना कलेची व कलावंतांची कदर नाही, असे त्यांचे मत झाले. त्यानंतर काही वर्षांनी अनंतराव पाटील, शंकर पाटील, भालचंद्र नेमाडे वगैरे लेखक दिल्लीला गेले होते. दिल्लीत आलोच आहोत तर यशवंतरावांची भेट घ्यावी असे सर्वांना वाटले. त्यांनी साहेबांना फोन केला. साहेबांनी सर्वांनाच घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले. रात्री नऊची वेळ ठरली. यशवंतरावांच्या घरात प्रवेश केल्यावर साहेबांनी सर्वांचे स्वागत केले. ' या, या, अनंतराव , ' असे म्हणून अनंतरावांना प्रेमाने खांद्यावर हात ठेवून जवळ बसवून घेतले आणि म्हणाले, ' अनंतराव, तुमचा आमच्यावर राग आहे.' अनंतराव गोंधळले. त्यांना काही आठवेना. पण साहेब पुढे म्हणाले, ' तुमचं ' सांगत्ये ऐका ' चित्रपटाचं शतकमहोत्सवी निमंत्रण मी नाकारलं म्हणून तुम्ही रागावला होता. पण खरोखरच कामाच्या रगाड्यात मला येणं जमलं नाही. तुमची निराशा केल्याची खंत मनात राहून गेली होती म्हणून वेळात वेळ काढून कराडच्या मुक्कामात मी कुणालाही न कळवता ते चित्र पाहिले. मला खूप आवडले. प्रत्यक्ष खेडेगांव, त्यातील समस्या, बारकावे यांचा साक्षात्कार एका मराठी दिग्दर्शकाने घडवला याचा अभिमान वाटला.' असे म्हणून साहेबांनी पुन्हा एकदा अनंतरावांचा खांदा थोपटला. अनंतरावांचे डोळे पाण्याने डबडबले. पटकन् त्यांनी यशवंतरावांचे पाय धरले. आठ - नऊ वर्षे मनात रुतून बसलेल्या गैरसमजाचा अश्रूवाटे निचरा झाला होता.