कथारुप यशवंतराव- भाषणस्वातंत्र्य

भाषणस्वातंत्र्य

सन १९७५ साली कराड येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते.  संमेलनाच्या अध्यक्षपदी दुर्गा भागवत यांची निवड झाली होती. स्वागताध्यक्ष या नात्याने संमेलनाची पूर्ण जबाबदारी यशवंतरावांकडे होती. ते त्यावेळी केंद्रात मंत्री होते. या संपूर्ण संमेलनात यशवंतराव प्रेक्षकांमध्ये बसून होते. त्यावेळी देशात आणीबाणी चालू होती. पंतप्रधान इंदिरा गांधी व काँग्रेस पक्षाच्या विरोधात जनमत वाढत चालले होते. आणीबाणी लादणा-या सरकारमध्ये यशवंतराव मंत्री होते तर दुर्गाबाई आणीबाणीच्या कट्टर विरोधक होत्या. दुर्गाताईंचे अध्यक्षीय भाषण जवळपास संपूर्णपणे आणीबाणीच्या विरोधात होते. अध्यक्षीय भाषणामध्ये यशवंतरावांकडे पाहून त्या आवेशाने म्हणाल्या, ' जे आणीबाणीचे समर्थक आहेत, ते देशाचे शत्रू आहेत.' साहेबांच्या शेजारी बसलेले एक नेते म्हणाले, ' बाई फारच जहाल बोलत आहेत. मला वाटतं त्या मर्यादा ओलांडत आहेत.'

यावर शांतपणे साहेब म्हणाले, ' बोलण्याचा त्यांचा अधिकार आहे. तो त्यांनी बजावलेला आहे. त्याबद्दल मला वाईट वाटण्याचे काहीच कारण नाही.'

एवढेच नव्हे तर भाषण संपल्यावर यशवंतरावांनी मंचाजवळ जाऊन दुर्गा भागवतांना नमस्कार करुन, भोजनासाठी भोजनगृहाकडे चलण्याची विनंती केली. भाषणस्वातंत्र्यावरची यशवंतरावांची श्रद्धा अशी कृतीशील होती. ती वरवरची नव्हती.