कथारुप यशवंतराव- मायेची भाकर

मायेची भाकर

यशवंतराव केंद्रात मंत्री असताना एकदा कराडच्या दौ-यावर आले होते. सर्किट हाऊसवर त्यांचा मुक्काम होता. दुपारी ज्येष्ठ नेते भाई माधवराव बागल यशवंतरावांना भेटण्यासाठी कोल्हापूरहून मोटारीने आले. साहेबांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद डोंगरे यांनी माधवराव आले असल्याची वर्दी साहेबांना दिली. यशवंतराव तात्काळ बाहेर आले. माधवरावांचे स्वागत करून त्यांना आत घेऊन गेले. दोघांच्या गप्पागोष्टी सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात सहज यशवंतरावांचे लक्ष मैदानातील एका झाडाकडे गेले. त्या झाडाखाली एक वृद्ध स्त्री उभी होती. यशवंतरावांनी तात्काळ त्या स्त्रीला ओळखले. ते माधवरावांना म्हणाले, ' माधवराव, तुम्ही बसा, मी लगेच परत येतो.' आणि उठून अनवाणी पायानेच चालत यशवंतराव या वृद्ध स्त्रीकडे गेले.

तिला वाकून नमस्कार केला. म्हातारीने यशवंतरावांच्या दोन्ही गालावरून हात फिरवून त्यांची दृष्ट काढल्यासारखे केले आणि फडक्यात गुंडाळलेली एक पुरचुंडी यशवंतरावांच्या हातात दिली. साहेबांनी त्याची आपुलकीने चौकशी केली. पुन्हा एकदा नमस्कार केला व परत आले. ती पुरचुंडी आतल्या खोलीत नेऊन ठेवली आणि पुन्हा माधवरावांशी गप्पा सुरू केल्या. इतका वेळ हा सारा प्रकार पाहणारे माधवराव बागल मात्र अस्वस्थ झाले. यशवंतरावांसारखा केंद्र सरकारमधील एक मोठा मंत्री एका साध्या वृद्धेला भेटण्यासाठी अनवाणी चालत जातो, तिला आदरपूर्वक नमस्कार करतो, तिने दिलेली एका शिदोरी मोठ्या श्रद्धेने घेऊन येतो हे त्यांना खटकले. यशवंतरावांनी आपल्या पदाची प्रतिष्ठा जपली पाहिले असे त्यांना वाटले आणि त्यांनी तस बोलूनही दाखवले.

यशवंतराव किंचित हसून म्हणाले, माधवरावजी , मघाशी झाडाखाली उभी होती ती वृद्ध स्त्री माझ्या आईची मैत्रीण आहे. मी कराडमध्ये शिकत असताना ती अधूनमधून आमच्या घरी यायची . येताना भाकरी बांधून आणायची. माझी आई व ती एकत्र भाकरी खात असत. त्यावेळी मी तिथे असलो तर मलाही भाकरी मिळायची. एकदा अशीच न्याहारी करताना आई तिला म्हणाली, ' यशवंताला भाकरी आवडते. मी आता थकले. उद्या असेन, नसेन. पण तू त्याला माझी म्हणून भाकरी देत जा. मला सामाधान होईल. ' या मावशीने माझ्या आईचा शब्द अक्षरश: पाळला आहे. मी कराडात येणार आहे असे तिला समजले तर ती खेड्यातून भाकरी घेऊन येते मला देत आणि समाधानाने परत जाते. ज्यादिवशी तिची भाकरी मला मिळते त्यादिवशी जेवताना अगोदर मी तिची भाकरी खातो आणि मगच ताटातील इतर पदार्थांना हात लावतो. ती वृद्धा मला आईच्या ठिकाणी आहे. माधवरावांच्या डोळ्यात अश्रू दाटले. सदगदित आवाजाने ते म्हणाले, ' मातृप्रेम काय असते याचे साक्षात दर्शन आज मला घडले .'