कथारुप यशवंतराव-कलावंतांनी काही पथ्ये पाळली तर....

कलावंतांनी काही पथ्ये पाळली तर....

केंद्रात मंत्री असताना कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेकदा यशवंतराव मुंबईला येत असत. नरिमन पॉईंट येथील ' रिव्हिएरा ' या त्यांच्या निवासस्थानी विविध क्षेत्रांतील लोक त्यांच्या भेटीसाठी येत असत. त्यात कलाकार, साहित्यिक, संगीतज्ञ , सहकार क्षेत्रातील लोक आणि पत्रकार असत.

एके दिवशी विख्यात संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र ( राम चितळकर ) यशवंतरावांना भेटायला आले. त्यांचे आत्मकथन नुकतेच प्रसिद्ध झाले होते. त्या पुस्तकाची एक प्रत साहेबांना भेट म्हणून देण्यासाठी ते आले होते. पुस्तक हातात घेतल्यावर यशवंतराव म्हणाले, ' तुमचा हा ग्रंथ मी वाचला आहे.' यशवंतरावांचे हे शब्द ऐकून सी. रामचंद्र थक्कच झाले. नुकतेच प्रकाशित झालेले आपले आत्मचरित्र आपण भेट देण्यापूर्वीच साहेबांनी वाचले आहे हे समजल्यावर त्यांना सुखद धक्का बसला. साहेब पुढे म्हणाले, ' तुमच्या या पुस्तकामध्ये तुम्ही लता मंगेशकर यांच्याबद्दल ज्या त-हेने काही गोष्टी नमूद केल्या आहेत ते केले नसते तरी चालले असते. त्या एक ज्येष्ठ व लोकप्रिय गायिका आहेत. तुम्ही ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक आहात. एकमेकांच्या सहकार्याने तुम्ही संगीत रसिकांना संतुष्ट केले आहे. दिल्लीत पं. नेहरुंच्या उपस्थितीत तुम्हा दोघांचा एक कार्यक्रम होणार होता. त्यावेळी तुम्हाला क्लेशकारक असे काही घडले, त्यात कुणाची चूक होती, या तपशिलात मी जात नाही. ती क्लेशकारक घटना तुम्ही पुस्तकात लिहिली आहे. अखेर तुमच्या मनाप्रमाणे कार्यक्रम यथासांग पार पडला. ते संगीत ऐकून पंडितजी गहिवरले. मला वाटते तो विषय तिथेच संपला. ज्येष्ठ कलावंतांनी अशी काही पथ्ये पाळली, तर समाजमनावर याचा मोठा अनुकूल परिणाम घडतो. माणूस म्हणून कलाकार अधिक श्रेष्ठत्व पावतो.'

सी. रामचंद्र शांतपणे ऐकत होते. त्यांच्या डोळ्यात पाणी आले. साहेबांनी खुबीने विषय बदलला. ते चित्रपटसृष्टी, त्याचे व्यक्तिगत जीवन याविषयी बोलू लागले. शेवटी उठताना सी. रामचंद्र म्हणाले, ' तुम्ही म्हणता तसा विचार मी करायला हवा होता.' असे म्हणून अश्रूपूर्ण नेत्रांनी त्यांनी यशवंतरावांचा निरोप घेतला. आज त्यांना सुसंस्कृतपणाचे मूर्तीमंत उदाहरण पहायला मिळाले होते.