व्होल्गा ते कृष्णा
कृष्णा - कोयनेच्या संगमावर वसलेल्या कराड शहरात यशवंतराव वाढले. त्यामुळेच असेल कदाचित ; पण नदीकाठ आणि नद्यांचा संगम पाहिला की, यशवंतरावांचे मन उल्हासित व्हायचे. तासनतास ते संगम पहात रहायचे आणि विचारांच्या तंद्रीत हरवून जायचे.
पुढे संरक्षणमंत्री झाल्यावर १९६३ साली यशवंतराव रशियाच्या दौ-यावर गेले. युरोपातील लोकांचे नद्यांविषयीचे प्रेम आणि नदीकाठचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न पाहून यशवंतरावांना अपार समाधान वाटले. याच दौ-यात स्लाव्हाकियाची राजधानी असलेल्या ब्राटीस्लाव्हा या शहरात त्यांचा मुक्काम असताना घडलेला हा प्रसंग.
त्यादिवशी शहराबाहेरील एका रम्य ठिकाणी संध्याकाळी फिरायला जाण्याचा आणि तिथेच जेवण घेण्याचा बेत ठरला होता. त्यानुसार कापेथियन पर्वतराजीच्या कुशीत वसलेल्या ' झोकशेके ' नावाच्या सुंदर रेस्टॉरंटमध्ये सर्वजण जेवायला गेले. त्यांच्या स्वागतासाठी रशियन तरुणांचा एक कलावृंद तिथे सज्ज होता. त्या तरुण गायक कलाकारांनी एक सुरेख गीत गायला सुरुवात केली. यशवंतराव लक्षपूर्वक ऐकू लागले. ते गीत रशियन भाषेत असल्यामुळे यशवंतरावांना त्याचा अर्थ समजला नाही. परंतु त्यातील स्वरांची आर्तता, नादबद्धता आणि तरलता यांनी यशवंतराव एकदम हळवे झाले. त्या गीताने त्यांच्या हृदयाची तार छेडली. गीतगायन संपल्यावर त्यांनी त्या गाण्याविषयी चौकशी केली तेव्हा त्यांना समजले की, त्या गायकांनी सादर केलेले गीत व्होल्गा नदीवर आधारित आहे. यशवंतरावांनी लगेच एका अनुवादकाच्या मदतीने त्या गीताचे इंग्रजी भाषांतर करून घेतले आणि आपल्या डायरीत ते टिपून ठेवले.
व्होल्गा नदीविषयीच्या गीतकाराच्या भावना आणि कृष्णा - कोयनेविषयीच्या यशवंतरावांच्या भावना सारख्याच होत्या. त्या गीताने यशवंतरावांच्या नजरेसमोर कृष्णाकाठ उभा केला. त्या दौ-यावरून परत आल्यावर यशवंतरावांनी दोन पत्रे लिहिली. एक कराडचे नगराध्यक्ष पी. डी. पाटील यांना आणि दुसरे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना ! नगराध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी कृष्णा कोयनेच्या प्रीतीसंगमावर एक सुंदर उद्यान तयार करण्याची सूचना केली, तर मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी पानशेतच्या प्रयत्नानंतर पुणे शहराजवळून वाहणा-या मुळा - मुठा नद्यांचे युरोपातील नद्यांप्रमाणे सुशोभीकरण व बांधबंदिस्ती करावी अशी विनंती केली. नदीकाठ आणि यशवंतराव यांच्यातील हा अनोखा भावबंध विलोभनीय आहे.