मी तुझ्या घरी येणार आहे !
छोट्यातल्या छोट्या कार्यकर्त्यांची आपुलकीनं विचारपूस करणं, त्याला आपलसं करणं ही यशवंतरावांची एक खास शैली होती. यासंदर्भात उल्हासदादा पवार यांनी सांगितलेली आठवण नमूद करण्याजोगी आहे. पुण्यात नाना पेठेतील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी यशवंतराव येणार होते. उल्हास पवार त्यावेळी त्याच भागात भाड्याच्या खोलीत रहात होते. त्यावेळी ते काँग्रेसचे एक सामान्य युवक कार्यकर्ते होते. चव्हाण साहेबांसारखा थोर नेता आपल्या घरी पाच मिनिटांसाठी तरी यायला हवा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. यासाठी त्यांनी दहा पैश्याच्या साध्या पोस्टकार्ड साहेबांना पत्र लिहिले.
' पुतळा अनावरण समारंभासाठी आपण पुण्याला येणार आहात. माझं घर कार्यक्रम स्थळापासूनच जवळच आहे. त्यावेळी पाच मिनिटांसाठी आपण माझ्या घरी आलात तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला खूप बरं वाटेल.'
असा मजकूर लिहून त्यांनी पत्र टाकलं. कार्यक्रमाचा दिवस उजाडला. साहेबांच्या स्वागतासाठी विमानतळावर इतर नेत्यांबरोबर पवारही गेले. तिथे साहेबांच्या स्वागतासाठी अनेक दिग्गज पुढारी पुष्पहार घेऊन रांगेत उभे होते. पवारांचा नंबर सर्वात शेवटी. त्यांच्याकडे ना हार, ना गुच्छ, ना फूल. साहेब आले. रांगेतील प्रत्येकाचं स्वागत स्वीकारत पुढे निघाले. एक नेते म्हणाले, ' चिरंजीवाचा साखरपुडा आहे.' तेवढ्यात दुसरे एक पुढारी म्हणाले, ' आम्ही कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले आहे. थोडावेळ का होईना पण तुम्ही येऊन जा.' अशा प्रकारे अनेक पुढारी साहेबांना निमंत्रण देत होते.पण साहेब नम्रपणे सर्वांना सांगत होते की, कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे शक्य नाही. रांगेच्या शेवटी पवार उभे होते. मोठमोठ्या पुढा-यांची निमंत्रणे साहेबांनी नाकारल्यामुळे पवारांना निमंत्रण देण्याचे धाडस होईना. इतक्यात साहेबच पवारांजवळ आले व म्हणाले, ' तुझं पत्र मिळालं मला, मी तुझ्या घरी येणार आहे.' हे ऐकून इतर नेते थक्क झाले. ' तू काय जादू केलीस ?' असे पवारांना विचारू लागले. पवार म्हणाले, ' जादू मी केली नाही, तर दहा पैश्याच्या पोस्टकार्डने केली आहे.' साध्या पोस्टकार्डवर दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करुन यशवंतरावांनी एका सामान्य कार्यकर्त्याचा सन्मान वाढवला होता.