कथारुप यशवंतराव- सौजन्यमूर्ती

सौजन्यमूर्ती

विख्यात कथाकार रंगनाथ पठारे यांनी सांगितलेली ही आठवण. १९७२ - ७३ साल असेल. प्रा. पठारे तेव्हा पुण्यात शिकायला होते. एके दिवशी सहज रस्त्याने फिरत असताना आबासाहेब गरवारे कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळ त्यांना काही गाड्या उभ्या असलेल्या दिसल्या. कॉलेजमध्ये कसला कार्यक्रम आहे म्हणून त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्यांना कळाले की, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या रौप्यमहोत्सव समारंभासाठी केंद्रीय गृहमंत्री ना. यशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये आले आहेत. पठारे उत्सुकतेने आत जाऊन बसले. लहानपणापासून ज्यांच्याविषयी आपण ऐकत आलो त्या यशवंतराव चव्हाणांना प्रत्यक्ष पाहण्याची व त्यांचे भाषण ऐकण्याची संधी आज आपणाला मिळणार याचा त्यांना आनंद झाला.

कार्यक्रमासाठीचा हॉल मोठा होता. अजून गर्दी झालेली नव्हती. ब-यापैकी माणसे आत येत होती. व्यासपीठावर मध्यभागी ना. यशवंतराव चव्हाण बसले होते. त्यांच्या बाजूला इतर मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी बसले होते. यशवंतराव अगदी आरामात, एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमासाठी आलेल्या कर्त्या पुरुषासारखे बसलेले होते. अगदी मोकळे वातावरण होते. कार्यक्रमाची वेळ झाली होती, परंतु एक पाहुणे अजून आले नव्हते. सर्वजण त्यांचीच वाट पहात होते. अचानक यशवंतराव उठले. ते समोर बघत होते. सभागृहातील सर्वच लोक यशवंतराव पहात होते त्या दिशेला पाहू लागले. एक वयस्क, सडपातळ तरीही ताठ चालीने चालत असलेले गृहस्थ व्यासपीठाकडे येत होते. हातात छडीवजा काठी होती. ते रँग्लर महाजनी होते. यशवंतराव व्यासपीठावरून खाली आले. त्यांनी रँग्लर महाजनी यांना आदरपूर्वक अभिवादन करून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना व्यासपीठावर घेऊन गेले. महाजनी त्यांच्या खुर्चीत बसल्यावरच यशवंतराव स्वत:च्या खुर्चीत बसले. हे सगळे त्यांनी इतक्या सहज आणि स्वाभाविकपणे केले की आपण विशेष काही केले असे त्यांच्या कृतीतून कोठेही दिसले नाही. पण स्वत:च्याही नकळत यशवंतरावांनी सुसंस्कृतपणाचा आणि सौजन्याचा प्रत्यय उपस्थितांना आणून दिला.