कथारुप यशवंतराव- सत्ता राबवणं अवघड असतं !

सत्ता राबवणं अवघड असतं !

राजकारणी व्यक्तींना अनेक प्रकारच्या समारंभांना उपस्थित रहावे लागते. त्या त्या वेळी समयोचित भाषण करावे लागते. त्यासाठी अर्थातच अभ्यास आणि पूर्वतयारी आवश्यक असते. पण काही अपवाद वगळता अनेकांना अशी पूर्वतयारी करणे नकोसे वाटते. ते आयत्यावेळी उत्स्फूर्त भाषण करतात. त्यांचे हे उत्स्फूर्त भाषण अर्थातच विषयाला धरून नसते. त्यामुळे श्रोत्यांचा विरस होतो. यशवंतरावांना अशाप्रकारे अनावश्यक व अघळपघळ बोललेले अजिबात आवडत नसे. ते स्वत: मोजक्या शब्दांत व मुद्देसूद भाषण करीत असत. त्यांच्या भाषणात फाफटपसारा नसायचा. असाच एक प्रसंग.

मिरज येथील उद्योजक भाई ताराचंद शहा यांनी मिरज शहरात सुभाषनगर गृहनिर्माण सोसायटीची स्थापना केली. या गृहनिर्माण प्रकल्पाच्या उदघाटनासाठी त्यांनी फॉरवर्ड ब्लॉकचे नेते व स्वतंत्र विदर्भाचे कट्टर पुरस्कर्ते आ. जांबुवंतराव धोटे यांना बोलावले. समारंभाचे अध्यक्ष होते यशवंतराव चव्हाण. जांबुवंतराव तेव्हा फारच लोकप्रिय नेते होते. आपल्या आक्रमक भाषणांनी ते विधानसभा दणाणून सोडायचे. यशवंतरावांच्या व जाबुवंतरावांच्या राजकीय भूमिका वेगळ्या होत्या. अशा दोन नेत्यांची भाषणे ऐकायला मिळणार म्हणून लोकांनी खूप गर्दी केली होती. जांबुवंतरावांनी अपेक्षेप्रमाणे आक्रमक भाषण केले. पण जाता - जाता त्यांनी यशवंतरावांना चिमटा काढलाच. तो कार्यक्रम राजकीय नव्हता. तरीही भाषणाच्या शेवटी जांबुवंतराव म्हणाले, ' आम्ही नेहमीच सत्ताधा-यांच्या विरोधात लढत राहू. त्यासाठीच आमचा जन्म आहे. आम्हाला सत्तेचा मुळीच लोभ नाही. ' शेवटचे वाक्य अर्थातच यशवंतरावांना उद्देशून होते. खरेतर आपण राजकीय भाषण करायचे नाही असे यशवंतरावांनी ठरविले होते पण जांबुवंतरावांच्या टीकेला उत्तर देणे भाग होते. अध्यक्षीय भाषण करण्यासाठी यशवंतराव उठले. संथ लयीत त्यांनी बोलायला सुरुवात केली. जांबुवंतरावांच्या भाषणाचा संदर्भ देत ते म्हणाले, ' जांबुवंतराव फारन छान बोलले. पण केवळ बोलून चालत नाही. विरोधात बोलणं सोंप असतं. सत्ता राबवणं अवघड असतं. जांबुवंतरावांनीही सतत विरोधाची भाषा न करता कधीतरी सत्ता राबविण्याचीही तयारी ठेवावी. नेहमीच विरोधात राहण्यापेक्षा सत्ता राबविण्याचं आव्हान जरूर स्वीकारावं.'

यशवंतरावांची ही गुगली भलतीच परिणामकारक ठरली. धोटेंच्या भाषणाचा श्रोत्यांवरील प्रभाव तिने पुसून टाकला. श्रोत्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.