का आला आहात मावशी ?
महाराष्ट्रातील जनतेने यशवंतरावांवर उदंड प्रेम केले. यशवंतरावांनीही या ऋणातून उतराई होण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. महाराष्ट्रभर यशवंतरावांचे अनेक चाहते होते, पण कराडच्या जनतेने त्यांच्यावर जे प्रेम केले ते खरोखरच शब्दातीत होते. कराडचे नाव राष्ट्रीय स्तरावर नेणा-या यशवंतरावांचा कराडच्या आबालवृद्धांना सार्थ अभिमान वाटत होता.
यशवंतराव केंद्रात मंत्री असताना एकदा कराडला आले होते. सोबत वेणुताईसुद्धा होत्या. कराडच्या गेस्ट हाऊसला त्यांचा मुक्काम होता. त्यावेळी भाई माधवराव बागल यशवंतरावांना भेटायला आले होते. दोघेजण गप्पा मारत असताना यशवंतरावांचे लक्ष दूरवर उभ्या असलेल्या म्हातारीकडे गेले. फाटक्या लुगड्यात काहीतरी गुंडाळून ती यशवंतरावांच्या भेटीसाठी ताटकळत उभी होती. पण पोलीस तिला आत जाऊ देत नव्हते. यशवंतराव पोलीसांना म्हणाले, ' त्यांना आत येऊ द्या.' दबकत दबकत ती म्हातारी आत आली. अंग चोरून कोप-यात उभी राहिली. यशवंतरावांनी तिला जवळ बोलावले आणि आपुलकीने विचारले,' का आला आहात मावशी ?'
म्हातारी म्हणाली,' सगळं गाव यशवंतरावाला नावाजतयं, तवा त्याला भेटून हार द्यावा म्हणून आलिया.' असे म्हणून तिने हार काढला व तो यशवंतरावांना घालू लागली. त्यांनी तो घेतला व परत तिच्याच गळ्यात घातला. तिला नमस्कार केला. इतक्यात वेणूताई बाहेर आल्या. त्यांनी तिला आत नेले. प्रेमाने जेवू घातले. यशवंतराव भाई माधवराव बागल यांना म्हणाले, ' माधवराव, अशी निखळ माया करणारी माणसे भेटली, की मला माझी आई आठवते. या लोकांच्या प्रेमातून मी कसा उतराई होऊ ?' असे म्हणून साहेबांनी डोळे पुसले.