आमचा महानोर कुठे आहे ?
साहित्य आणि समाज हे यशवंतरावांच्या अत्यंत जिव्हाळ्याचे विषय होते. अनेक साहित्यिकांशी त्यांचे मित्रत्वाचे संबंध होते. हे संबंध औपचारिक किंवा कृत्रिम नव्हते, तर सहजपणे जपलेले आणि जोपासलेले होते. महाराष्ट्रातील शेकडो नव्या जुन्या लेखक कवींची नावे त्यांना पाठ होती आणि त्या त्या भागात गेल्यावर तिथल्या साहित्यिकांची ते आवर्जून चौकशी करायचे.
एकदा औरंगाबाद शहरात यशवंतरावांची सभा होती. कार्यक्रम राजकीय नव्हता पण व्यासपीठावर राजकारण्यांचीच गर्दी होती. त्या भाऊगर्दीत लेखकांना व कवींना कोण विचारतो ? ते बिचारे जागा मिळेल तिथे बसले होते. काहीजण उभेच होते. इतर वक्त्यांची भाषणे झाल्यावर शेवटी यशवंतराव बोलायला उठले. भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा नामोल्लेख करू लागले. हे करीत असताना त्यांची नजर व्यासपीठावर कोणाला तरी शोधत होती. पण त्यांना अपेक्षित असलेली व्यक्ती तिथे दिसने. शेवटी ते म्हणाले, ' अरे, या सभेत आमचा तरुण कवी कुठे दिसत नाही ?' साहेब कोणाबद्दल बोलत आहेत हे नेतेमंडळींना समजेना. मग यशवंतरावांनीच खुलासा केला, ' अरे, आमचा महानोर कुठे आहे ?' मग सभेत महानोरांचा शोध सुरू झाला. ते सभेत उपस्थित होते पण दूरवर पाठीमागे गर्दीत उभे होते. कार्यकर्त्यांनी धावपळ करून महानोरांना शोधून काढले. यशवंतरावांनी त्यांना व्यासपीठावर बोलावून घेतले आणि श्रोत्यांना त्यांची ओळख करून दिली. खरं तर महानोर तेव्हा तरुण होते, नवखे होते. प्रसिद्धीच्या झोतात आले नव्हते. अशा नवख्या कवीला देशाच्या गृहमंत्र्यांनी इतका मोठेपणा द्यावा याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले. अशा छोट्या - छोट्या कृतीतूनच यशवंतरावांनी साहित्यिकांचा सन्मान जपला. उदयोन्मुख राजकीय नेत्यांना एक आदर्श घालून दिला.