तुमच्या मुखात ही भाषा नको !
केंद्रीय अर्थमंत्री असताना यशवंतराव एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले होते. महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाचे अनेक महत्त्वाचे नेते या कार्यक्रमाला हजर होते. याच काळात मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना बदलण्याची मागणी जोर धरू लागली होती. मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे अशी मागणी उघडपणे होऊ लागली होती.पुण्यातील यशवंतरावांची सभा संपल्यानंतर मराठवाड्यातील युवक कार्यकर्त्यांचा एक गट ' मराठवाड्याला मुख्यमंत्रीपद मिळाले पाहिजे ' या मागणीचं निवेदन घेऊन यशवंतरावांना भेटला. निवेदन स्वीकारत असताना यशवंतराव सहजपणे म्हणाले, ' मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ ही भाषा, बाळांनो, आमच्या पिढीपुरतीच संपू द्या. तुमच्या पिढीच्या मुखात ही भाषा नको. मराठवाड्याचा मुख्यमंत्री पाहिजे ' असं कशाला म्हणता ? मराठवाड्याचं नाही, महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मागा. हे प्रादेशिक भेद तुमच्या पिढीने विसरले पाहिजेत.'
यशवंतरावांनी ही अपेक्षा व्यक्त केली त्याला आता चाळीस वर्षे होत आली. त्यानंतर अनेक पिढ्या आल्या आणि गेल्या, पण हा प्रश्न शिल्लकच आहे. खरोखरच आपण प्रादेशिक भेद विसरलो का ?