हे आमचे दुर्दैव होय !
स. का. पाटील हे काँग्रेस पक्षाचे मुंबईतील महत्त्वाचे नेते होते. यशवंतरावांचे आणि त्यांचे विशेष सख्य नव्हते. यशवंतरावांना गृहमंत्रीपद देण्याचा निर्णय तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतला, तेव्हा स. का. पाटील यांनी या निर्णयाला विरोध केला होता. पण आता ते थकले होते. त्यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. ते अत्यवस्थ होते. भेटीला आलेल्या लोकांना ओळखू शकत नव्हते. स. का. पाटलांची भेट घ्यावी असे यशवंतरावांना वाटले. एके रात्री त्यांनी पाटलांसोबत असणा-या रमेश भोगटेंना फोन केला व म्हणाले, ' नगरला आण्णासाहेब शिंदेंच्या मुलीचे लग्न आहे. मी उद्या पहाटे विमानाने तेथे जाऊन येतो. परवा सकाळी आठ वाजण्यापूर्वी तू ' रिव्हिएरा ' मध्ये ये. आपण तेथूनच बॉम्बे हॉस्पिटल मध्ये जाऊ.' त्याप्रमाणे भोगटे गेले. त्यांना घेऊन यशवंतराव बॉम्बे हॉस्पिटलमध्ये गेले. अंथरुणाला खिळलेल्या पाटलांना पाहून यशवंतरावांना गहिवरुन आले. काही वेळ इकडे तिकडे फिरुन त्यांनी पाटलांना न्याहाळले. बाहेर आल्यावर ते आपला हुंदका आवरू शकले नाहीत. ' महाराष्ट्राचा सिंह आज, असा अगतिक होऊन पडावा हे आमचे दुर्दैव होय.' या शब्दात त्यांनी आपले दु:ख व्यक्त केले व दरवाजाबाहेर जमलेल्या लोकांना भेटून ते परत गेले.